सुनिता विल्यम्स यांना अंतराळातून कुंभमेळा दिसला मात्र तुकोबा दिसले नाही.
संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले अखेर सुनीता विल्यम्स व त्यांचे साथीदार नऊ महिन्यांनी अंतराळातून सुखरूप पृथ्वीवर पोहोचले. याचा माणूस म्हणून मनस्वी आनंद झाला आहे.सुनीता विल्यम्स व त्यांच्या साथीदारांनी नऊ महिने अंतराळात घालवले आणि सुखरूप परतले.
या घटनेने मला विनाकारण तुकोबांची आठवण का येत आहे, हे समजत नाही. आपले तुकोबा देखील गरुड विमानात बसून असेच सदेह वैकुंठाला गेले. त्यांनी देखील कधीतरी आपल्याला भेट देण्यासाठी यावे. अशी तळमळ आपल्या प्रत्येकाच्या मनात आहे.
कदाचित सुनीता विलियम्स व त्यांच्या साथीदारांना वैकुंठ व तुकोबांचे दर्शन झाले असेल. अद्याप त्यांचे हे अनुभव भारतीय प्रसार माध्यमांमध्ये आलेले नाहीत. त्यांनी वरून कुंभमेळा पाहिला असे मात्र सांगितले जात आहे. अंतराळातून कुंभमेळा दिसत होता, तर अंतराळात असलेले वैकुंठ त्यांना निश्चितच दिसले असेल,तसेच तेथे सदेह वावरणारे तुकोबाही दिसले असतील.
विश्वाच्या आजवरच्या इतिहासात सदैव वैकुंठाला जाणारा एकमेव महापुरुष म्हणजे तुकोबा. ब्रह्मदेवाच्या मुखातून बाहेर आलेल्यांपैकी देखील कुणी सदेह वैकुंठाला गेले नाही. तेथे तुकोबांसारखा शूद्र कुणबी सदेह वैकुंठाला गेला, हा तर सर्व शुद्रांच्यासाठी अत्यंत अभिमानाचा विषय असला पाहिजे.
भगवान बुद्ध,भगवान महावीर, महायोगी गोरक्षनाथ, आदी शंकराचार्य असे एकापेक्षा एक महान लोक जगाच्या पाठीवर होऊन गेले,तरी सदेह वैकुंठात जाण्याचा मान फक्त आणि फक्त तुकोबांना मिळाला. साक्षात भगवान विष्णूने आपल्या छातीवर एका ब्राह्मणाने लाथ मारली त्याचा वळ किंवा ब्राह्मणाच्या पावलाची ती खून जपून ठेवलेली आहे.
अशा भूवैकुंठातील भूदेव असलेल्या ब्राह्मणांपैकी देखील कोणी वैकुंठाला गेला नाही. तुकोबांच्या समकालीन असलेले छत्रपती शिवराय व छत्रपती संभाजी महाराज यांना देखील त्यांच्या सदेह वैकुंठाला जाण्याची खबर मिळाली नाही. ही ब्रेकिंग न्यूज त्याकाळी संपूर्ण भारतात देखील पसरली नाही.
तुकोबांपेक्षा श्रेष्ठ असलेले त्यांचे समकालीन रामदास स्वामी यांनासुद्धा गरुड विमानाने सदैव वैकुंठाला नेले नाही. याचा अर्थ सदेह वैकुंठाला जाणारा एकमेव माणूस म्हणजे तुकोबा.त्यामुळे खरे तर जगात तुकोबा सोडून कोणाचीच पूजा होणार नाही. असा दंडक देखील आपल्या धर्मशास्त्रांनी निर्माण केला नाही.
धर्म बुडवला म्हणून पैठणच्या धर्मपिठाने दंडित केलेले तुकोबा सदेह वैकुंठाला जातात. याचा अर्थ धर्मशास्त्र व धर्मपीठ हे थोतांड आहे असा होतो का ? आज आपल्या देशात नव्हे तर जगात तुकोबा सोडून कोणाचेही मंदिर व भक्ती शिल्लक राहता कामा नव्हती. किरकोळ बाबा- बुवांना,स्वामींना ब्रम्हांडनायक म्हणणारे तुकोबांना कधीही ब्रम्हांडनायक म्हणत नाही.
एवढेच काय तर ब्रह्माच्या मुखातून आलेल्या कोणीही आजवर आपल्या मुलाचे नाव तुकाराम ठेवलेले नाही. जगातील एकमेव श्रेष्ठ व्यक्ती जी की सदैव वैकुंठाला गेली, ती म्हणजे तुकोबा. ते इतके उपेक्षित का राहावे ? एकाही ब्रह्मावृंदाच्या देव्हाऱ्यात तुकोबांचा फोटो नाही.
जसा विष्णूचा अवतार होऊन देखील बुद्ध देव्हाऱ्यात नाही. खरे तर जगात तुकोबांचा सोडून कोणाचाच फोटो अथवा मूर्ती कोणाच्याही देव्हाऱ्यात असता कामा नये. अमेरिकेतील तीन लोक ५ दशकांपूर्वी चंद्रापर्यंत पोहोचले तरी त्यांना वैकुंठ व तुकोबा दिसले नाही. हे अमेरिकी गोरे आपल्यापासून काहीतरी सत्य लपवत आहेत. त्यांना गरुड विमान,वैकुंठ व तुकोबा दिसले असतील,तरी ते आपल्याला सांगत नसतील.
तुकोबा वैकुंठाला गेले. त्यावेळी आपल्या गोव्यामध्ये पोर्तुगीजांनी महाविद्यालय सुरू केले होते.त्यांच्या महाविद्यालयात देखील ही घटना सांगितली गेली नाही आणि शिकवली गेली नाही. त्यानंतर अवघ्या वीस वर्षात त्या न्यूटनने गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लावला.
तुकोबांच्या गरुड विमानात बसून सदैव वैकुंठाला जाण्याच्या घटनेला खोटं ठरवण्यासाठी मिथ्या गुरुत्वाकर्षण शक्तीची कल्पना जगाला दिली. सुनीता विल्यम्स या भारतीय वंशाच्या आहेत. त्यांच्याकडून तरी आपण आता काही आशा ठेवू शकतो. अन्यथा मंबाजी व रामेश्वर भट यांच्या वंशातील काही लोकांचे शिष्टमंडळ अंतराळात पाठवणे आवश्यक आहे, कारण मंबाजी व रामेश्वर भट या दोघांनीच तुकोबांना वैकुंठाला जाताना पाहिले होते. त्यामुळे त्यांच्या वंशजांना गरुड विमान कसे होते आणि वैकुंठाचा नेमका पत्ता कोणता आहे, हे माहिती असेल. अन्यथा तुकोबा ज्या धुळवडीच्या दिवशी गरुड विमानात सदेह वैकुंठाला गेले, त्या धुळवळीचा धुराळा शांत होणार नाही.
डॉ.राहुल हांडे
संगमनेर फोन नं 8308155086
