बीज म्हणजे काय ?
असा प्रश्न माझ्या एका मित्राने विचारला तेंव्हा त्यांना जे काही सांगितले तर त्यांनी यावर दोन शब्द लिहण्याची विनंती केली म्हणुन हा लेखन प्रपंच.
खऱ्या अर्थाने आज तुकाराम बीज आहे.त्यामुळे बीज या शब्दाचे कुतूहल असणे स्वाभाविक आहे.बीज या शब्दाचा सर्व सामान्य माहीत असणारा अर्थ म्हणजे धान्य किंवा फळ याच्या बी ला बीज म्हटले जाते.बीज या शब्दाला तुकाराम महाराजांच्या नावाशी जोडले की मग तुकाराम महाराज आणि बी या शब्दाचा सुसंगत अर्थ जुळत नाही.ज्यांना बीज या शब्दाचा दुसरा अर्थ माहित आहे त्यांची या संदर्भात अडचण नाही.
भारतीय कालगणना यासाठी समजून घ्यावी लागेल.इंग्रजीत महिन्याचे दिवस एक,दोन, तीन, चार असे अठ्ठावीस ते एकतीस असे त्यात्या महिन्याप्रमाणे मोजण्याची पद्धत आहे.मराठी महिन्यात प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी,सप्तमी,अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, चतुर्दशी मग पंधरावा दिवस पौर्णिमा किंवा अमावस्या असा पंधरवाडा असतो. दोन पंधरवाड्याचा मिळून एक महिना होतो. साधारणपणे प्रत्येक मराठी महिन्यात एकदा दिवस सण किंवा अन्य परंपरेला अनुसरून महत्त्वाचा असल्यास त्याला विशेष नामाभिधान आहे.
मराठी महिन्यातील कार्तिक महिन्याचा पहिला दिवस बली प्रतिपदा किंवा दीपावली पाडवा,तसेच चैत्र पाडवा या नावाने ओळखला जातो.येथे पहिल्या तिथीला प्रतिपदा किंवा पाडवा या विशेष नामाने संबोधले जाते. प्रत्येक पंधरवाड्यातील दुसऱ्या तिथीला द्वितीया पण विशेष प्रसंगी बीज म्हटले जाते. याचे दोन उदाहरणे आहेत. एक दिवाळीच्या वेळी भाऊबीज आणि फाल्गुन द्वितीयाला तुकाराम बीज म्हटले आहे. प्रतिपदा - पाडवा, द्वितीया- बीज,दशमी- दसरा, द्वादशी - बारस, त्रयोदशी- तेरस,चतुर्दशी- शिवरात्र या काही तिथी सण किंवा विशेष प्रसंगी उपरोक्त वेगळ्या नावाने संबोधल्या जातात.
सोबतच प्रत्येक तिथीला एक दोन सण उत्सव आहेत. उदाहरणार्थ अक्षय तृतीया, हरतालिका तृतीया, गणेश चतुर्थी, संकष्ट चतुर्थी, रंग पंचमी, एकनाथ षष्ठी, सप्तमी बद्दल माझ्या वाचनात काही नाही. गोकुळ अष्टमी, राम नवमी, अहेव नवमी, विजया दशमी, आषाढी एकादशी, कार्तिक एकादशी, वसू बारस, धन त्रयोदशी, अनंत चतुर्दशी. गुरू पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमा, सोमावती अमावस्या. अश्या प्रकारे प्रत्येक तिथी वर्षात एखादा विशेष दिवस घेवुन आला आहे.
अमावस्येच्या अधल्या दिवसाला शिवरात्र असे म्हटले जाते पण माघ महिन्यातील शिवरात्रीला महा शिवरात्र असे म्हणतात.
बीज नामाभिधान कोठून आले ?
भारतात दोन या अंकाला बे नावाने ओळखले जाते. जसे मराठीत बे चा पाढा आहे. गुजराती किंवा काही भाषेत दोन या अंकाला बीज म्हटले जाते. या संदर्भातील एक सुपरिचित म्हण आहे.
जेणे काम तेणे थाय । बिजा करो गोता खाय ।
या ठिकाणी बिजा हा शब्द आला आहे. हाच शब्द बीज या नावाने तयार झाला आहे.
बाळासाहेब मिसाळ पाटील
