आस्तिकांचा राग भयंकर..!

Cityline Media
0
आस्तिकांच्या लालाय्लू भुमिकांमुळेच नास्तिकांचा वास्तविक होरा.

मागे कधीतरी सोशल मीडियावर एका मेंढपाळाचा व्हिडिओ पाहण्यात आला. यामध्ये मेंढपाळाला आपल्या मेंढ्यांना कालव्याच्या पाण्यात अंघोळ घालायची होती. मेंढपाळाने एका मेंढीला पाण्यात लोटले,हे पाहून सर्व मेंढ्यांनी पाण्यात उड्या मारल्या.
मेंढपाळाला मेंढ्यांकडून ही कृती करून घेण्यासाठी फारसे श्रम करावे लागले नाही. हे दृश्य पाहत असताना उगाच डोळ्यासमोर प्रत्येक धर्माचे धर्मगुरू आणि अत्यंत आस्तिक भावाने धर्माचे अनुसरण करणारे लोक  उभे राहिले. मेंढ्यांचा व्हिडिओ पाहिल्यानंतर डोळ्यासमोर मेंढपाळ म्हणून धर्मगुरू आणि मेंढ्या म्हणून आस्तिक का उभे राहिले असावेत ?, हा प्रश्न मनाला सतावत राहिला. 

अशावेळी भगवान बुद्धांच्या एका अनमोल वचनाची आठवण झाली.ज्यामध्ये बुद्ध म्हणतात की,'आम्ही आस्तिक ही नाहीत, नास्तिक ही नाहीत तर वास्तविक आहोत.' जगात असे वास्तविक होऊन जगणे खूप अवघड आहे. वास्तविक होऊन जगणे म्हणजे कळपापासून वेगळे होणे.प्रवाहाच्या विरुद्ध पोहणे.

यातच वास्तविक व्यक्ती कळपाकडूनच कळपाचा विनाकारण शत्रू ठरवला जातो.वास्तविक व्यक्तीच्या मनात मात्र कळपातील लोकांसाठी अपार सहानुभूती व प्रेम असते. धर्म व कर्मकांड यांच्या नावाखाली सर्वसामान्य माणसांचे चाललेले शोषण व फसवणूक त्याला अस्वस्थ करत असते. यातून त्यांची सुटका व्हावी अशी त्याची तळमळ असते.

असे असले तरी कळपातील आस्तिक ह्या वास्तविक व्यक्तीला आपला सर्वोच्च कोटीचा शत्रू मानतात. त्याचा तिरस्कार करतात. जमल्यास बहिष्कार देखील करतात. हीन भावनेने त्याच्याकडे पाहतात व बोलतात. वास्तविक माणूस मात्र असे कधीही करत नाही.

तो फक्त आपले विचार व्यक्त करत असतो.धार्मिकता व आस्तिकता यांच्या आवरणाखाली बहुसंख्यांचे होत असलेले शोषण त्याला पाहवत नसते. त्यामुळे तो त्यांना केवळ प्रकाश दाखवण्याचा प्रयत्न करतो. मात्र अंधाराची सवय झालेल्या लोकांना प्रकाश आपला शत्रू वाटत असतो. 

जगाचा आजवरचा ज्ञात इतिहास पडताळल्यास धर्म सोडून इतर कोणत्याही संकल्पनेने मनुष्य जातीचा रक्तपात व शोषण मोठ्या प्रमाणात केलेले दिसत नाही. जगातील प्रत्येक धर्माचा इतिहास व वर्तमान हा रक्तरंजितच आहे.

आस्तिक लोक वास्तविक वा नास्तिक लोकांचा तिरस्कार का करत असावेत? या प्रश्नाची उकल होणे गरजेचे आहे. न पाहिलेला किंवा न अनुभवलेला परमेश्वर त्यांना अंतिम सत्य वाटत असतो. त्याच्या नावाने उभी राहिलेली धर्म संस्था त्याचे कसे शोषण करते हे समजण्याची क्षमता आस्तिकांच्या कळपातील कोणाकडेच नसते. 

त्यांना एखादा व्यक्ती वास्तविक अथवा नास्तिक आहे हे समजले तर त्यांची माथी ठणकतात. हा आपल्यासारखा बिनडोक का नाही? आणि स्वतःचे डोके चालवण्याचा प्रयत्न का करत आहे? हा न्यूनगंड त्यांना अस्वस्थ करतो. त्याला राक्षस ठरवले जाते.

अशावेळी चार्वाक जाळले जातात.बुद्धांना त्रास दिला जातो. ज्ञानदेवांना समाधी घ्यावी लागते. नामदेवांना महाराष्ट्र सोडून पंजाबात जावे लागते. एकनाथांना वाळीत टाकले जाते. तुकोबांना त्यांच्या गाथेसह इंद्रायणीचा डोह मिळतो. वर्तमानात नरेंद्र दाभोळकर गोविंदराव पानसरे कलबुर्गी गौरी लंकेश यांनाही देहदंड दिला जातो. जगाचा इतिहास पाहता कोणत्याही नास्तिकाने अथवा वास्तविकाने कोणत्याही आस्तिकाच्या रक्ताचा एक थेंबही सांडवलेला नाही.

त्यांनी धर्मयुद्ध केले नाही.दंगल केली नाही.ते धर्माच्या नावाने अतिरेकी झाले नाहीत.कोणाला मारण्याची जाळण्याची भाषा त्यांनी कधी केली नाही. त्याचबरोबर मी नास्तिक अथवा वास्तविक आहे, तर समोरच्याने देखील तसेच व्हावे यासाठी बळजबरी देखील केली नाही. ते फक्त बोलत राहिले, सांगत राहिले आणि आस्तिकांकडून होणारा त्रास सहन करत राहिले.

आस्तिकतेचे सर्वात मोठे लक्षण म्हणजे शाकाहार. शाकाहारी लोकांकडून मांसाहारी लोकांना मिळणारी वागणूक डोळ्यासमोर आणल्यास आपल्याला आस्तिकांची नास्तिक अथवा वास्तविकांच्या विषयीची वर्तणूक लक्षात येऊ शकते. मी शाकाहारी आहे. 

याचा प्रखर अहंकार शाकाहारी लोक प्रत्येक ठिकाणी व्यक्त करत असतात. हे शाकाहारी आस्तिक खरे तर भक्ती मार्गावर चालणारे पांथस्थ असतात. भक्ती मार्गावरील पहिले पाऊल म्हणजे अहंकाराचा त्याग आणि अखिल विश्वाबद्दल  सहानुभूती व प्रेम. असे असताना शाकाहारी आस्तिक अत्याधिक अहंकारी झालेले दिसतात.

मी आस्तिक आहे व शाकाहारी आहे.याचा प्रचंड अहंकार त्यांच्यामध्ये आलेला असतो. आपल्या प्रत्येक बाह्य वर्तनातून आपल्या आस्तिकतेचे व शाकाहाराचे प्रदर्शन करणे म्हणजे धर्म अथवा भक्ती असा त्यांचा समज असतो. नास्तिकाला अथवा वास्तविकाला बुद्धी आहे व त्याला प्रश्न पडतात याचा प्रचंड राग त्यांना येतो.

 यावर त्यांच्या धर्मगुरूंनी त्यांना एक मास्टर की दिलेली असते, ती म्हणजे परमेश्वर ही ज्ञानेन्द्रयांना  जाणवणारी संवेदना नाही. तसेच चर्मचक्षुंना दिसणारी वस्तू नाही. ती आत्म्याने व मनाने जाणली जाते. विविध रूपात परमेश्वर आपल्याला भेटत असतो. सहकार्य करत असतो व त्याचे अस्तित्व लक्षात आणून देत असतो.

ही गोष्ट नास्तिकांना वास्तविकांना समजणारी नाही.ते मूर्ख आहेत. विविध धर्मातील आस्तिकांचे कळप कायम एकमेकांशी झुंजत असतात. त्यांची भांडणे ही मोठी मजेदार कारणावरून असतात. तुमच्या धर्मात परमेश्वराला काय म्हणतात, तुमच्या धर्माची आचरण पद्धती कशी आहे, तुमच्या धर्माचे उपासना स्थळ कसे आहे.

अशा सर्व मानवनिर्मित गोष्टींवरून हे लोक लढतात-मरतात व संपतात. यातील एकही गोष्ट ते ज्याला परमेश्वर म्हणतात त्यानी निर्माण केलेली नसते. परमेश्वराला नाव माणसाने दिले. त्याचे उपासना स्थळ माणसानेच निर्माण केले. त्याच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या धर्माचे प्रतिक माणसांनीच तयार केली.

त्याच्या संदर्भातील कर्मकांड माणसानेच तयार केले. अशा सर्व गोष्टीं मानव निर्मित असून देखील ईश्वर निर्मित म्हणून एकमेकांचे रक्त सांडवायला तयार होतात. जगातील सर्व अमली पदार्थांमध्ये धर्म या अमली पदार्थ एवढी नशा पाहायला मिळत नाही. त्यामुळे नास्तिक अथवा वास्तविक म्हणजे अंधाऱ्या गुहेच्या घनदाट अंधाराची सवय झालेल्या वटवाघळांपैकी एखादा दिवसा बाहेर पडून सूर्य व त्याचा प्रकाश पाहून आलेले  वटवाघूळ असते. हे वटवाघुळ जगात प्रकाश आहे, 

हे सांगू लागते.त्यावेळी अंधार हेच जीवन आहे.यावर आंधळी व अढळ श्रद्धा घेऊन हजारो वर्षे जगणारी इतर वटवाघळ त्याच्या प्रकाशाच्या गोष्टीने अस्वस्थ होतात. अखेर ही अस्वस्थता त्यांच्या सहनशीलतेच्या पल्याड जाते आणि अखेर सूर्य पाहिलेल्या वटवाघळाला संपवून अंधाराचे राज्य अबाधितपणे असेच सुरू राहते.
डॉ.राहुल हांडे,
  संगमनेर फोन न.8308155086
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!