नाशिक (दिनकर गायकवाड)
नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनचे सदस्य तथा नाशिक मधील जलतरणपटूंनी कोची येथे झालेल्या स्विमॅथॉन स्पर्धेत भाग घेऊन ती यशस्वीरीत्या पूर्ण केली.
विशेष म्हणजे सर्वांत ज्येष्ठ सायकलपटू व जलतरणपटू दीपक भोसले यांनी ६२ व्या वर्षी ६ किमी अंतर पूर्ण केले आणि सर्वांना तंदुरुस्त आणि सक्रिय जीवन जगण्याची प्रेरणा दिली. ही बाब नाशिककरांसाठी अभिमानास्पद असल्याची प्रतिक्रिया अनेक जलतरणपटूंनी व सायकलपटूंनी व्यक्त केली. नासिक सायकलिस्ट फाऊंडेशनचे संचालक दीपक
भोसले, तसेच बिजेंद्र मलिक, शंतनू दास,डॉ.सपना नेरे, संदीप दास यांनी नुकत्याच झालेल्या कोची येथे भारतातील सर्वांत लांब नदीत झालेल्या स्विमॅथॉनमध्ये सहभाग घेतला व ही स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केली.
कोची अल्ट्रा स्विमॅथॉन २०२५ असे या स्पर्धेचे नाव होते.या स्पर्धेत दास, मलिक आणि डॉ. नेरे सपना यांनी १० किमी पूर्ण केले. हे सर्व जलतरणपटू नाशिक सायकलिस्टचे सदस्य आहेत आणि सावरकर जलतरण तलावात नियमितपणे सराव करतात. त्यांच्या यश व कामगिरीबद्दल नाशिकच्या सायकलपटूंमध्ये व जलतरणपटूंमध्ये त्यांचे अभिनंदन होत आहे.
