नाशिक (दिनकर गायकवाड) नाशिक शहर पोलिस आयुक्तालय हद्दीतील गंगापूर, इंदिरानगर,सरकारवाड, भद्रकाली,म्हसरूळ,तसेच पुणे शहर व जिल्ह्यातील चंदननगर, दौंड व पिंपरी चिंचवड या पोलीस ठाण्यांच्या हद्दींतील विविध सोनसाखळी चोऱ्यांचा छडा लावण्यात गंगापूर पोलिसांना यश आले आहे.यासह नाशिक शहरातील मोटारसायकल चोरीच्या एकूण १० गुन्ह्यांचा यशस्वी तपास करून ११ लाख २३ हजार ६८८ रुपयांचा मौल्यवान मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईत चार आरोपी आणि तीन विधीसंघर्षित बालकांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत गेल्या महिन्यात दि. २९ मार्च २०२५ रोजी गंगापूर रोडवरील शांतीनिकेतन चौकाजवळ एका महिलेकडून चेनस्नॅचिंगप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासात पोलीस हवालदार रवींद्र मोहिते यांना मिळालेल्या
गुप्त माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचून अक्षय सुनील बोरकर (वय १९), राज सखाहरी गायकवाड (वय १९), परवेझ ऊर्फ सोनू जावेद मणियार (वय २४), विलास प्रमोद विसपुते (वय ३९) यांच्यासह तीन विधीसंघर्षित बालकांना अटक करण्यात आली आहे.
या टोळीकडून आठ सोनसाखळ्या (एकूण वजन सुमारे ९५ ग्रॅम, किंमत ७,८८,८८८ रुपये), दोन मोटारसायकली (बजाज पल्सर व रायडर) (अंदाजे किंमत २,२०,००० रुपये) यांसह इतर दागिने (मूल्यः २,१४,८००), असा ११ लाख २३ हजार ६८८ रुपये किमतीचा माल हस्तगत करण्यात आला आहे.
शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त (परिमंडळ १) किरणकुमार चव्हाण आणि सहायक पोलीस आयुक्त नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी मोहीम गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत, पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांच्यासह गुन्हे शोध पथकाने यशस्वी केली. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
