नाशिक (दिनकर गायकवाड) येथील जिल्हाधिकारी
जलज शर्मा यांनी प्रत्येक महिन्यातील पहिला सोमवार नो व्हेईकल डे आणि युनिफॉर्म डे हा उपक्रम जाहीर केला होता. त्यानुसार जानेवारी महिन्यापासून महिन्याच्या प्रत्येक सोमवारी नो व्हेईकल डे आणि युनिफॉर्म डेची अंमलबजावणी करण्यात येते.
महिन्यातील पहिल्या सोमवारी काल जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्यासह कार्यालयातील पुरूष व महिला कर्मचाऱ्यांनी नो व्हेईकल डे आणि युनिफॉर्म डेची अमंलबजावणी केली.
जिल्हाधिकारी जलज शर्मा हे त्यांच्या शासकीय निवासस्थापासून रिक्षाने जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले.तर जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी देखील वाहनांचा वापार न करता पायी कार्यालयात पोहचले.
ज्या कर्मचाऱ्यांचे निवासस्थान दूर आहे,अशा कर्मचाऱ्यांनी सायकलने जिल्हाधिकारी कार्यालय गाठणे पसंत केले.तर बऱ्याच कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक वाहनसेवेचा उपयोग केला.
दरम्यान, शहरात वाढत्या वाहनांची संख्या व प्रदूषणात होणारी वाढ लक्षात घेता एक दिवस सर्व वाहनांना विश्रांती घेऊन शासनाने उपलब्ध केलेल्या सार्वजनिक यंत्रणेचा वापर करून कार्यालयात येण्याची सूचना जिल्हाधिकार्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना केली आहे.
दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी हा प्रयोग करण्यात येणार आहे. ही प्रणाली महिन्यातील केवळ एक दिवसासाठी असली तरी या योजनेच्या यशावरून भविष्यात जिल्ह्यातील इतर सर्वच कार्यालयांमध्ये याचा अवलंब केला जाईल, अशी शक्यता आहे. जिल्हाधिकारी कार्यालयापासून ज्यांची घरे जवळ आहेत त्यांच्याकडून पायी पायी अथवा सायकल ने येत नो व्हेईकल डे यशस्वी अमंलबजावणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येते.
मात्र एप्रिलच्या पहिल्या सोमवारी उन्हाचा कडाका चांगलाच वाढल्याने सार्वजनिक वाहन सेवेचा वापर करत अनेक कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले.