बुद्ध भुमीच्या भारत वर्षातील लोकनायक डॉ.बाबासाहेब आंबेडकर
आज कलियुगामध्ये जी काही मानवी मूल्य जपणारी राष्ट्रे आहेत आणि ज्या देशात संविधानात्मक लोकशाही शाबूत ठेवण्यात ज्यांनी महत्त प्रयत्न केले त्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जगाच्या प्रथम स्थानी आहेत असेच म्हणावे लागते.
सूर्य तळपावा त्या तेजास्तव त्यांनी आपल्या ज्ञानाने आणि अफाट बुद्धीने या देशाला स्वातंत्र्य, समता,बंधुता प्रस्थापित करणारी लोकशाही संविधानाच्या रूपाने दिली. त्याच प्रमाणे सामाजिक जाणिवेची बांधिलकी आणि समस्त भारतीयांचे कल्याणकारी विचार मनात ठेवून अनेक कार्य मोठ्या नेटाने पार पाडले.
अफाट ज्ञानसंचय : डॉ.बाबासाहेबांनी देशात आणि परदेशात जाऊन चार चार वर्षाचा असलेला अभ्यास अत्यंत कमी कालावधीत पूर्ण करून अनेक पदव्या मिळविल्या, त्यातील त्यांचे अभ्यासाचे कष्ट पाहता असा महामेरू अजूनतरी पृथ्वीवर जन्माला आला नाही अन येणार पण नाही, हे पूर्ण सत्य आहे आणि त्याचा अभिमान समस्त भारतीय समाजाला,असणे गैर नाही.
कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी "प्रॉब्लेम ऑफ रुपी" या अर्थशास्त्र विषयात पीएच.डी. प्राप्त करून आपले असामान्यत्व सिद्ध केले. त्यांचे शैक्षणिक कार्य निश्चितपणे आजच्या पिढीला आणि पुढे कालियुगाच्या अंतापर्यंत मानवाला प्रेरणा देईल यात कोणताच किंतु परंतु नाही. वाचा,सुसंस्कृत व्हा,एकत्र या,संघटन करा म्हणजे कुणी तुम्हास आणि समाजावर अन्याय करणार नाही असे त्यांनी आपणास पटवून दिले.मात्र एखादा संघर्ष लोकोपयोगी होत नसेल, आपला वेळ,श्रम वाया जात असेल आणि माणसे त्यात नाहक बळी पडत असतील तर असे फलनिष्पत्ती नसणारे कार्य सोडून दिले पाहिजे असे त्यांनी स्पष्ट सांगितले आहे.
याचे उदाहरणे पाहू.तत्कालिन अस्पृश्य समाजाला ,शूद्रांना अतिशय अमानवीय वागणूक ब्राह्मण वर्गाकडून दिली जात होती.साध्या मूर्तीला स्पर्श करण्याचा आणि दर्शन घेण्याचा अधिकार त्यांना नव्हता. अशा प्रसंगी तो हक्क मिळवून देण्यासाठी मंदिरात प्रवेश मिळविण्यासाठी नाशिकला काळाराम प्रवेश सत्याग्रह सुरू केला.
त्यात दादासाहेब गायकवाड जानोरी आंबे, दिंडोरी हे आपल्या हजारो बांधवासह सत्याग्रहाची मुख्य धुरा वाहत होते.परंतु हटवादी ,हेकेखोर, सनातनी ,ब्राह्मण मंडळींनी हरिजन,दलित,आदिवासी या लोकांना प्रवेश नाकारला, त्या श्रीरामाच्या चरणला साधा स्पर्श देखील करू दिला नाही.आणि हा संघर्ष १९३० ते १९३५ पर्यंत चालू होता. या प्रसंगी डॉ ,बाबासाहेब काळाराम मंदीर येथे आले असता त्यांच्यावर देखील बुद्धिभ्रष्ट झालेल्या लोकांनी दगड फेक करून त्यांना देखील जखमी केले व अन्य लोकांना लाठ्या काठ्यांनी मारल्याने ते जखमी झाले .अशी परिस्थिती असतानाही बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना शांत बसण्यास सांगितले.
जर बाबासाहेबांनी पुढील परिणामांचा विचार केला नसता तर जातीय संघर्ष घडून रक्तरंजित घटना घडली असती.परंतु विवेक,संयम व बुद्धीचातुर्य दाखवत त्यांनी संघर्ष टाळला. मंदिरात जर आपल्याला साध्या प्रवेशाला नाकारले जाते, वंचित ठेवले जाते तर मग अशा देवाचे दर्शन घेण्यात काय उपयोग ? असा प्रश्न उभा राहतो.
या पार्श्वभूमीवर डॉ.,बाबासाहेबांनी आम्हाला तो भेदाभेद करणारा,माणसाला माणसाप्रमाणे न वागविणारा धर्मच नको म्हणून येवला येथील सभेत धर्म परिवर्तनाची घोषणा केली, तेंव्हा मात्र काही पुरोगामी विचारांच्या ब्राह्मणांनी बाबासाहेबांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला, की तुम्ही दुसरा धर्म स्वीकारू नका, परंतु बाबासाहेबांनी
त्यांना प्रतिसाद न देता, 'बौद्ध' हा जगाला शांती देणारा धर्म नागपूर येथे विधीवतपणे स्वीकारला हे जगश्रुत आहे.
तात्पर्य ज्या आंदोलनासाठी वेळ ,पैसा,मानवी श्रम वाया जाते आणि साध्य काहीच होत नसेल असे असे संघर्ष,आंदोलन,चळवळ करू नये असा त्यांचा संदेश समस्त जगाला व समाजाला आज देखील विचारप्राणव करणारा आहे.
रिझर्व्ह बँकेची स्थपना,जलव्यवस्थापन,भूमिहीन लोकांसाठी जमीन,कामगारासाठी कामाचे तास घोरण,शिक्षणसंस्था स्थापना,वसतिगृहे उभारणी ,दलित व आदिवासी करीता घटनेत राखीव जागांची तरतूद ,करून सरकारी नोकरीत व राजकीयदृष्ट्या आरक्षण अशा अनेक तरतुदी करून लोकहिताचे काम त्यांनी करून ठेवल्याने त्यांचे कार्य समस्त भरतीयांनी मनात साठवून आपण आदर्शयावत जगले पाहिजे.आदर्श राज्य कसे करावे याची मार्गदर्शक तत्वे त्यांनी घटनेत मांडून ठेवली.
पण काही लोक आणि त्यांच्या कार्याचा म्हणा की विचाराचा अभ्यास नसलेले लोक, राजकीय लोक त्यांचे कार्य सोयीस्कर विसरून जातात केवढे दुर्भाग्य!
जो पर्यंत भारतात लोकशाही आहे, जेथे मानवी कल्याणाचा आणि समतेचा विचार रुजला आहे, त्या देशात डॉ.बाबासाहेब आंबेडकर ,विश्व संपले तरी त्यांच्या महान कार्यद्वारे अजरामर राहतील.सूर्या सारखे तळपत जगाला, अंधांना प्रकाश देतील.समस्त मानवाला मानवी मूल्यांची दीक्षा देतील. त्यामुळे जातपात,धर्मद्वेष करणारे, समतेला नाकारणारे, वैचारिकदृष्ट्या अधिपतीत झालेले लोक मात्र केंव्हाच काळाच्या पडद्याआड जातील.
आपण त्यांच्या त्यांच्या कार्याचे काय भान ठेवावे - डॉ. बाबासाहेबानी आपल्याला लढण्याची हिम्मत दिली. तसेच आपण स्वतः ची तर प्रगती करावीच परंतु आपण अत्यंत निष्ठेने कोणतेही काम करून आपल्याला कर्तृत्वाची छाप पडता अली पाहिजे.समाजाचे आपण देणे लागतो हा विचार मनात साठवून त्या अनुषंगाने कृती झाली पाहिजे. तसेच जेथे जेथे अन्याय आणि शोषण आहे त्याविरोधात सांघिक पणे लढले पाहिजे. तसेच आपली नैतिकता तर पराकोटोची असावी.त्याच बरोबर चारित्र्य आणि वैक्तिक नीतिमूल्य चळवळीत काम करताना राखली गेली पाहिजे.
समाज प्रबोधन करण्यासाठी त्यांनी "मूकनायक आणि प्रबुद्ध भारत" ही वृत्तपत्र काढून तत्कालिन समजातील प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा करून एका बाजूला न्याय तर दुसऱ्या बाजूला हक्काचे सामाजिक प्रश्न तडीस नेण्यास हातभार लावला आहे.त्यांच्या विचारातील प्रत्येक शब्द आज देशातील राजकारभार करणाऱ्या राज्य कर्त्याना मार्गदर्शन ठरत आहे. म्हणून भारत देश हा जगातील उच्चकोटींची लोकशाही टिकवून ठेवणारा देश आहे.तसेच त्यांनी हेही सांगितले होते की घटना सुंदरच आहे पण तिची आमलबाजावनी करणारे लोकप्रतिनिधी निर्बुद्ध असतील तर देशाचे अधःपतन देखील होण्याचा धोखा आहे.
तेंव्हा आपण सतत सजग राहणे इष्ट आहे एवढे मात्र खरे. एकूनच आपल्या आठवणीत राहतील फक्त डॉ.भीमराव आंबेडकर !भारत देशाचा एक सुपुत्र, महामानव ! एक प्रखर तळपता सूर्य! जगाला दिपस्तंभ बनून!
