नाशिक शहर व जिल्हा हा विविधतेने समृद्ध आहे.धर्म, कला, साहित्य, संस्कृती, शिक्षण आणि प्रबोधनाच्या चळवळी या संबंधित पायरवाच्या अनेक ऐतिहासिक खुणा या परिसरात असल्याचे दिसून येते.स्वातंत्र्यपूर्व काळातील ब्रिटिश राजवटीविरुद्ध इथे झालेल्या कितीतरी घडामोडींच्या नोंदी इतिहासात उपलब्ध आहेत.
कुंभमेळ्याचे ठिकाण असल्याने हे शहर धार्मिक दृष्टीकोनातून जसे जगप्रसिद्ध आहे, तद्वतच सातवाहन राजांच्या काळात कोरलेल्या बौद्ध लेण्यांच्या अमिट वास्तव्यामुळेही हे शहर जागतिक स्तरावर अधोरेखित आहे धार्मिक कर्मठता उजागर करणा-या अनेकविध घटनांसह, प्रागतिक विचारांच्या चळवळींचा दस्तावेजानेही हा जिल्हा प्रकाश झोतात राहिल्याचे निदर्शनास येते.
विशेषतः स्वातंत्र्य पूर्व काळात क्रातीबा जोतीराव फुले यांच्या विचारांना प्रमान मानून निर्माण झालेल्या सत्यशोधक चळवळीने येथील बहुजनांना प्रबोधित केले आहे. आंबेडकर कालीन आणि आंबेडकरोत्तर काळातील परिवर्तनाच्या चळवळींचा इथे राहिलेला राबता देश परदेशातही प्रेरक ठरलेला आहे.ऐतिहासिक दस्तऐवजांच्या आधाराने पुरोगामी व परिवर्तनवादी विचार चळवळींच्या येथील काही ठळक नोंदी प्रस्तुत लेखात साक्षांकित करण्याचा प्रयत्न केला आहे.
सत्यशोधक चळवळीचा पायरव
महाराष्ट्रात १९ व २० ही दोन शतकं प्रबोधनाच्या चळवळींचा सुवर्णकाळ म्हणून इतिहासात अधोरेखित आहेत.१९ व्या शतकात जोतीराव फुलेंच्या क्रांतीकारी चळवळींचा बहुजनांवर प्रभाव होता. तर २० वे शतक हे आंबेडकरी विचारातील परिवर्तनाच्या चळवळींनी अजरामर असल्याचे निदर्शनास येते.२० व्या शतकाच्या प्रारंभी ज्योतीराव फुले यांच्या परखड विचारांचा प्रचार करणारी 'सत्यशोधकी जलशा'ची चळवळ नाशिक जिल्ह्यात अस्तित्वात होती.
सत्यशोधकांनी फुलेंचा सेक्युलर विचार व त्यांचा 'गुलामगिरी' हा ग्रंथ, चळवळीचा 'मेनोफेस्टो' मानून, त्यावर आधारित 'सत्यशोधक जलसे' निर्माण केले. फुलेंच्या निधनोत्तर काळात सुरू झालेली प्रस्तुत चळवळ, सावित्रीबाई फुलेंच्या नेतृत्वाखाली वेगवान झालेली होती. भास्करराव जाधव, भिमराव महामुनी, कृष्णराव भालेकर आदींनी ती महाराष्ट्रात राबविली. छत्रपती राजर्षी शाहू महाराज, हे त्या चळवळीचे आधारवड होते. विचारवंत जी. ए. उगले यांच्या 'सत्यशोधकांचे अंतरंग' या ग्रंथात उपरोक्त संदर्भ नमूद आहेत.
सत्यशोधकी जलस्यांचे मालक मराठा किंवा तत्सम सवर्ण कुळातील असत. वादक व गायक कलावंतांमध्ये दलितांचा भरणा असे. जलसांचे कार्यक्रम गावातील चावडीसमोर होत. त्यातील कलावंत महार-मांगापैकी आहेत हे चोरून, कलावंत 'मराठा' असल्याचे लोकांना सांगितले जात असे. ( आंबेडकरी जलसे, ले. डॉ. भगवान ठाकूर) सत्यशोधकी जलसे तत्कालीन तमाशाच्या बाजावर आधारित होते. परंतु तमाशाचा पारंपरिक आशय जलसेकारांनी नाकारलेला होता. नवा मूल्याधिष्ठित आशय घेऊन सत्यशोधकी जलसे निर्माण करण्यात येत असत. शेटजी, भटजी, सालकार, जमीनदार यांच्या शोषणाला विरोध व वर्णवर्चस्वातून स्त्री-शूद्रातिशूद्रांची मुक्तता, हे उद्दिष्ट सत्यशोधकी जलसांचे होते. सनातनी व्यवस्थेचा भांडाफोड करणारे पोवाडे, गाणे, संवाद या स्वरूपात जलस्यांचे सादरीकरण होत असे. सत्यशोधकी जलस्यांतील विषय, व्यक्तीरेखा आणि भाषा कालसुंसंगत होती. अडाणी शेतकरी, भटजी, शेतमजूर, विधवा स्त्रीयां, सत्याजी, पाटील, कुलकर्णी अशी पात्रे जलस्यांमध्ये असत.
१९०७ सालापासून पिंपळगाव बसवंत येथील गणपतदादा मोरे यांच्या माध्यमातून 'सत्यशोधकी जलसांची' चळवळ नाशिक जिल्ह्यात सुरू झाली. १९१६ साली गणपतदादांनी मनोरंजनासह प्रबोधन करणारा स्वत:चा 'सत्यशोधक शाहिरी जलसा' उभा केला. त्याचे खेळ नाशिक जिल्ह्यात होत. मध्यंतरात वणीचे रावसाहेब थोरात हे प्रबोधनपर व्याख्यान देत असत. शेतकरी, शेतमजूरांचे प्रश्न, जाती निर्मुलन, विटाळ विध्वंसन, हुंडा पध्दती, स्त्रीदास्य अशा तत्कालीन ज्वलंत समस्यांवर गणपतदादा जलसे सादर करीत. त्यांना नाशिक जिल्ह्यातील रुंंजाजी शिंदे पाटील, मनाजी दगडू कांबळे, अधिकारी असलेले डी. आर.भोसले, सावळाराम दगडूजी घोलप, किर्तीवान निंबाळकर आदींचे सहकार्य लाभत असे. त्यांचा 'जलसा' राजर्षी शाहू महाराजांच्या उपस्थितीतही संपन्न झालेला होता, असे प्रा. अशोक सोनवणे यांनी गणपतदादांच्या चरित्रात नोंदलेले आहे. साधारणपणे १९३० च्या जवळपास 'सत्यशोधकी जलसे' संपुष्टात आल्याचे निदर्शनास येते.
आंबेडकरकालिन आंबेडकरी चळवळ
धार्मिक दृष्टीने अस्पृश्य मानलेल्या समाजाला नाशिक येथील काळाराम मंदिरात प्रवेश असावा, यासाठी २ मार्च १९३० पासून मंदिर परिसरात सत्याग्रह सुरू झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मार्गदर्शन व कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सदर सत्याग्रह जवळपास पाच वर्षे टप्याटप्याने सुरू राहिला. सत्याग्रहाच्या कालावधीत सत्याग्रहींसह डॉ. आंबेडकर आणि अग्रणी नेत्यांवर सवर्णांकडून हल्ले झाले. शेकडो सत्याग्रहींना तुरूंगवास सहन करावा लागला. परंतु येथील कर्मठ विचारांच्या धर्मपंडितांनी अस्पृश्यांना मंदिर प्रवेशाचा हक्क नाकारला. याच काळात म्हणजे
२३ सप्टेंबर १९३१ रोजी नाशिक जिल्ह्यातील मुखेड गावी अस्पृश्यांनी 'पांडवप्रताप' ग्रंथाची पालखीतून मिरवणूक काढली. तेंव्हा गावातील सवर्ण गावगुंडांनी अस्पृश्यांना मारहाण केली. समकाळात इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या गोलमेज परिषदेत डॉ. आंबेडकर व म. गांधी यांच्यामध्ये अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघाच्या प्रश्नावर संघर्ष सुरू होता. मुखेडच्या एकतर्फी दंगलीचे पडसाद थेट 'लंडन टाइम्स 'वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाले. परिणामी " मीच अस्पृश्यांचा पुढारी आहे " असे जे वक्तव्य म. गांधी परिषदेत करीत होते, त्यास छेद जावून डॉ. आंबेडकर हेच अस्पृश्यांचे खरे पुढारी आहेत, यावर शिक्कामोर्तब झाले. कारण मुखेड येथून दंगलग्रस्तांनी तसे टेलिग्राम डॉ. आबेडकरांना पाठविण्यात आले होते. या पार्श्वभूमीतूनच पुढे १९३२ साली गांधी-आंबेडकरांमध्ये पुणे करार झालेला होता.
नाशिक जिल्ह्यातील येवला येथे डॉ. आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली १९३५ ला 'मुंबई इलाखा अस्पृश्य परिषद' झाली. या परिषदेवर काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाचा प्रभाव होता. ज्या मंदिरात कुत्र्या-मांजरांना प्रवेश आहे, परंतु हिंदू असूनही अस्पृश्यांना प्रवेश नाही म्हणून हिंदू धर्मात अस्पृश्यांची होणारी मानहानी नाकारून "मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही." अशी ऐतिहासिक घोषणा डॉ. आंबेडकरांनी केली. त्यातूनच पुढे १९५६ साली त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला. नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह हा अस्पृश्यांनी केलेल्या धर्मांतराची पार्श्वभूमी आहे, असे अभ्यासांती म्हणता येते.
आंबेडकरी संगीत जलसे
'आंबेडकरी संगीत जलस्यां'चे आद्य लेखक, निर्माते व सादकर्ते नाशिक जिल्ह्यातील कसबे सुकेणे येथील शाहीर भीमराव धोंडिबा करडक हे आहेत. ४ फेब्रुवारी १९३१ साली त्यांनी नाशिक जवळील चांदोरी गावात 'सत्याग्रहाचा फार्स' असे शिर्षक असलेला 'जलसा' प्रथम सादर केला. समकाळात नाशिक येथे सुरु असलेल्या काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाच्या पार्श्वभूमीवर सदर जलसाचे सादरीकरण करण्यात आले होते. (संदर्भ:आंबेडकरी जलसे : स्वरूप व कार्य - ले. भीमराव करडक ) समकाळात प्रस्तुत जलस्याच्या प्रेरणेतून व अनुकरणातून आंबेडकरनिष्ठ कलावंतांनी महाराष्ट्राभर जलसे निर्माण केले. शा. भीमराव करडकांनी विविध विषयांवर एकूण २५ जलसांच्या संहिता लिहून ते सादर केलेले होते, अशी माहिती त्यांनीच लिहिलेल्या 'आंबेडकरी जलसे स्वरूप व कार्य' या पुस्तकात नमूद आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तत्त्वज्ञान व त्यांच्या चळवळीचा आविष्कार सदर जलसांच्या संहितांमधून प्रकट होतो. शा. कर्डकांचे समकालीन असलेले जलसेकार शा. शंकर पवार, केशव सुका आहेर, रामचन्द्र सोनवणे, पांडुरंग पवार, रामचंद्र खंडागळे, केरूजी घेगडे, केरूबुआ गायकवाड, माधवराव आहेर, जलसेकार पगारे, भीमराव आढांगळे, बाबूराव घोलप, लक्ष्मण केदार, सोनू केदार, धनाजी अढांगळे आदीं जलसेकार हे नाशिक जिल्ह्यातीलच आहेत. डॉ. भगवान ठाकूर यांचा 'आंबेडकरी जलसे' आणि डॉ. कृष्णा किरवले यांचा 'आंबेडकरी शाहिरी' हे दोन्ही संशोधनपर ग्रंथ या संदर्भात सांद्यत माहिती देणारे मौलिक दस्तावेज आहेत.
जलसेकारांनी पारंपरिक तमाशा आणि सत्यशोधकी जलस्यांच्या मूळ स्वरूपात काही बदल करून, आंबेडकरी जलसाचा आकृतीबंध साकारला होता. त्यांनी पारंपरिक तमाशाची संरचना स्वीकारली होती. परंतु तमाशातील आशय मात्र पुर्णतः नाकारला होता. सदर जलसांच्या आशय हा आंबेडकरी तत्त्वज्ञान व आंबेडकरी चळवळनिष्ठ होता. जलसेकारांनी तमाशातील कृष्ण, पेंद्या आणि गौळणी यांच्यातील बिभस्त संवाद आणि गौळणींचे शृंगारिक नृत्य (लावणी ) नाकारले. तद्वतच देवदेवतांचे स्तवन आणि सत्यशोधक जलसांतील एकेश्वराला वंदन करण्याची प्रथाही नाकारून महामानवांना गौरविण्याचा नवा पायंडा त्यांनी पाडला होता. उदा-
हे भीमराया नमितो पाया
द्यावी मती आम्हा तव गुण गाया || धृ ||
जगी आम्हा नाही वाली | तुच आमुची कृपा सावली |अस्पृष्यांची खरी माऊली | दलितांना उद्धाराया
द्यावी मती आम्हा तव गुण गाया || १ ||
( आंबेडकरी जलसे, भगवान ठाकूर, पृष्ठ-२३२ )
१) संगितमय कवनं, संवाद आणि फार्सच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणे. २) बाबासाहेबांचे तत्त्वज्ञान व कर्तृत्वाचा प्रचार व प्रसार करणे ३) विषमतावादी अनिष्ट प्रथा-परंपरांचा भांडाफोड करून, समता तत्त्वाचा जागर मांडणे. ४) शहरांसह गांवगाड्यातील सामान्य माणसाला आंबेडकरी चळवळीकडे आकृष्ट करणे. ही प्रमुख उद्दिष्टे आंबेडकरी जलसा़च्या निर्मितीमागे होती. महाड येथील चवदार तळ्यावरील सत्याग्रह, नाशिकचा काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह, गोलमेज परिषदेतील बाबासाहेबांचे कार्य, गांधी व आंबेडकरांमधील पुणे करार, शेड्युल कास्ट फेडरेशनचे कार्य या विषयांसह ; शिक्षणाचे महत्त्व, जात-धर्मातील विषमता, वेसकरकी, अनिष्ट खानपान, व अंधश्रद्धा सोडण्याचे आवाहन असे काल सुसंगत विषय जलसांमधून सादर केले जात असत. साधारणपणे १९५५ सालच्या जवळपास 'आंबेडकरी जलसांचा' झंझावात थांबल्याने दिसून येते.
पुढील काळातील प्रबोधनकारी लोकनाट्ये, संगीत मेळे, कलापथके, शाहिरांच्या गीतांची जुगलबंदी असलेले सामने, कलापथके आणि बैठ्या गायन पार्ट्यांचा उगम; जलसांच्या पोटातून झाला आहे. नाशिक कर्मभूमी असलेले महाकवी वामनदादा कर्डक हेदेखील त्या पार्श्वभूमीतूनच उदयाला आलेले आहेत , हे नाकारता येत नाही.
आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळ
आंबेडकरोत्तर काळातही नाशिक हे आंबेडकरी चळवळीचे केंद्र म्हणून वलयांकित असल्याचे निदर्शनास येते. कर्मवीर दादासाहेब गायकवाडाचे खंदे नेतृत्व हे त्याचे महत्वाचे कारण. आमदार, खासदार म्हणूनही दादासाहेबांचे कर्तुत्व बहुजन समाजामध्ये नावारूपाला आलेले होते. बाबासाहेबांनी स्थापन केलेला स्वतंत्र मजूर पक्ष, शेड्यूल कास्ट फेडरेशन आणि आंबेडकरोत्तर कालखंडातील 'रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ' या राजकीय संघटनांमध्ये त्यांचे नेतृत्व ललांभूत ठरले होते. १९६४ साली त्यांनी उभारलेला भूमिहिनांचा देशव्यापी सत्याग्रह हजारो भूमिहीन शेतमजूरांच्या उपजिवेकासाठी फलदायी ठरला होता. बौद्धांच्या आरक्षणाचा प्रश्न, शिक्षणाचे प्रश्न, अंधश्रद्धा निर्मूलन, दलित, वंचितांसाठी विद्यार्थी वस्तीगृहे व बौद्धांच्या निवासी वस्त्यांच्या निर्मितीलाही त्यांनी यशस्वीपणे चालना दिल्याचे दाखले उपलब्ध आहेत. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या चळवळीत त्यांची राहिलेली सामीलकी सहभाग व नाशिक जवळील ओझर येथे मिग विमानाचा कारखाना केंद्राकडून मिळविण्यात ते प्रमुख होते. त्यांच्या हयातीत आंबेडकरी परिवर्तनाची चळवळ उदात्त ध्येयाने प्रेरित व उर्जाशील होती. ॲड. हरीभाऊ पगारे आणि भावना भार्गवे यांनी लिहिलेल्या त्यांच्यावरील चरित्रग्रंथातून त्यांची सार्वजनिक उज्वल कारकिर्द उजागर आहे. दादासाहेबांच्या पत्नी जिजाताई गायकवाड आणि सहकारी डॉ. शांताबाई दाणी व त्यांच्या ठिकठिकाणच्या अनुयांयामुळे त्यांचे राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक कार्य आंबेडकरी समाजासह बहुजनांना मार्गदर्शक व उत्कर्षदायी ठरल्याचे दिसून येते.
दलित पँथर चळवळ
१९७२ साली मुंबईत 'दलित पॅंथर' ही संघटना बौद्ध युवकांनी स्थापना केली. सदर संघटना वायुवेगाने नाशिक जिल्ह्यातही पोहचली. या संघटनेत कवी, कलावंत, लेखक, पत्रकार व शिक्षित युवकांचा सहभाग होता. या संघटनेने आक्रमकपणे दलित पीडितांच्या प्रश्नांना शासन दरबारी वाचा फोडली. जातीय अन्यायाच्या विरोधात उग्र आंदोलने केली. सभा, संमेलनं, परिषदा व लेखनातून आंबेडकरी तत्त्वज्ञान व दलितांवरील विविध पातळ्यांवर होणारे अन्याय प्रकाशमान केले. त्यामुळे पीडितांना काहीअंशी न्याय मिळाला. पॅंथर चळवळ अल्पायुषी ठरली. परंतु त्या संघटनेच्या प्रेरणेतून पुढील काळात अनेक नामाभिदानं असलेल्या सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय संघटना निर्माण झाल्याचे निदर्शनास येते. त्यातून लढाऊ कार्यकर्ते, कवी, लेखक, नाट्य कलावंत व शाहीरांची मोठी फळी उदयाला आली. त्यांनी आपल्या अभिव्यक्तीतून परिवर्तनाचा विचार सतत जागता ठेवला. आंबेडकरकालिन चळवळीचे प्रत्यक्षदर्शी महाकवी वामनदादा कर्डक, बाबूराव बागुल यांच्या सहवासातूनही अनेक साहित्यिक व गीतकार, गायक नावारुपाला आले. त्यांनी प्रबोधनाच्या चळवळीला बळ दिले
• नव्वोदत्तरीच्या काळातील आंबेडकरी चळवळ •
८० ते २००० ही तीन दशकं आंबेडकरी चळवळीसाठी उर्जस्वल दशकं म्हटली जातात. या काळात औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा लढा, गायरान जमिनीच्या प्रश्नांवरील आंदोलने, सवर्णांकडून एकतर्फी लादलेले जातीय दंगलींविरूद्धची दलितांची एकजूट, महापुरूषांच्या पुतळ्यांची विटंबनेविरूद्धचे एल्गार, रिडल्स अर्थात बाबासाहेबांनी लिहिलेलं लिटरेचर शासनाने छपावे यासाठी निघालेले यशस्वी मोर्चे, बौद्धांच्या आरक्षणाच्या चळवळी, बौद्ध विहारे, वाचणालये स्थापण्यास्तव झालेल्या चळवळी, आरपीआयचे एकईकरणाचे वारे, ओबीसींच्या प्रश्नांवर आंबेडकरवाद्यांनी रस्त्यावर उतरून केलेली आंदोलने, ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांच्या राजकीय चळवळीचा उदय आणि दलित साहित्याची झालेली प्रचंड निर्मिती, स्वतंत्र साहित्य संमेलने अशा अनेक घटनांनी प्रस्तुत काळ, आंबेडकरी परिवर्तनासाठी उत्कर्ष काळ होता. त्या एकूणच घडामोडींमध्ये नाशिक शहर व जिल्हाची सामीलकी लक्षवेधी राहिलेली होती.
महाराष्ट्रात वर्तमानात आंबेडकरी परिवर्तनाची चळवळ आवर्तात सापडली आहे, असा आरोप होत असला तरी; त्यात फारसे तथ्य नाही. नव्या जाणिवा व बदलत्या प्रश्नांना भिडण्याची क्षमता सद्यस्थितीतील चळवळीतील तरूणाईमध्ये दिसून येते. नाशिक जिल्ह्यामध्येही ते भान प्रकर्षाने प्रकाशमान असल्याचे निदर्शनास येते.
प्रा. गंगाधर अहिरे, नाशिक
प्रसिद्ध साहित्यिक
