नाशिक (दिनकर गायकवाड) काठे गल्लीजवळील परिसरात अनधिकृत दर्गा प्रचंड पोलीस बंदोबस्तात नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने हटविला.
१५ दिवसांपूर्वी काठे गल्लीच्या जवळील अनधिकृत असलेला सातपीर दर्गा हटविण्यासाठी पोलिसांनी नोटीस दिली होती:मात्र काल रात्रीपर्यंत दर्गा हटविण्यात न आल्याने रात्री मुस्लिम धर्मगुरू व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची बैठक होऊन तो हटविण्याबाबत ठरले.ही गोष्ट समजताच शेकडो नागरिक तेथे जमा झाले व त्यांनी पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज करून अश्रुपुराच्या नळकांड्या फोडल्या. आज पहाटे साडेपाच ते साडेसहा वाजेच्या दरम्यान तो दर्गा हटविण्यात आला.पोलिसांनी वेळीच खबरदारीचा उपाय केल्याने परिस्थिती नियंत्रणात असून,तो परिसर निर्मनुष्य करण्यात आला आहे.
नाशिक महानगरपालिकेकडून या दर्याचे बांधकाम बुलडोझरच्या सहाय्याने हटविण्यात आले. काठे गल्ली परिसरात अनधिकृत दर्गा हटविण्याची गेल्या अनेक वर्षांची मागणी होती. गेल्या महिन्यात काही हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलनेही केली होती.वक्फ बोर्ड आणि उच्च न्यायालयात या संदर्भातील सुनावणी झाली आणि उच्च न्यायालयाने दर्गा ट्रस्टला १५ दिवसांच्या आत दर्गा काढण्याबाबत नोटीस बजावली होती.
दगडफेकीत २१ पोलीस अधिकारी व कर्मचारी जखमी झाले
जखमी झालेले पोलीस अधिकारी व कर्मचारी सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके,सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव, पोलीस निरीक्षक युवराज पत्की, पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण, पोलीस निरीक्षक एस. बी. काकडे, व्ही. डी. वालके, एस. व्ही. नागवडे, ए. एल. जंगले,
के, वाय. कुवर, पी. एन. कोहोक, व्ही. ए. जवक, एस. डी. पांडे, आर. एस. जंगलानी, बी. जी. रोहक, एम. एम. मुलानी, व्ही. एल. स्पेकरे, एन. आर. जाधव, आर. बी. राठोड, एल. पी. आदवडे, आर. आर. राऊत, इनामदार, के. ए. मिसाळ,जखमी झाले असून, तीन पोलीस वाहनांचे नुकसान झाले आहे.
यावेळी नाशिक मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधिकारी, चार जेसीबी, सहा ट्रक, दोन डम्पर व सुमारे ५० कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते. परिस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक,पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, किरणकुमार चव्हाण, मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके, नितीन जाधव, पद्मजा बढे व शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणी १५ जणांना ताब्यात घेतले असून, ५७ संशयितांच्या मोटारसायकलीदेखील ताब्यात घेतल्या आहेत. परिसरातील काही गाड्यांचेदेखील या दगडफेकीत नुकसान झाले आहे.
सध्या परिसरात शांतता असून या मार्गावरील वाहतूक पुढील तीन दिवस बंद ठेवण्यात आली असून बंदोबस्त कायम राहणार आहे.
