ललित बूब यांची पत्रकार परिषदेत माहिती
नाशिक (दिनकर गायकवाड) इंडस्ट्रीज
मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) ने कॅमेरून पाठोपाठ सलग दुस-या दिवशी नायजेरियातील वीज पुरवठा करणाऱ्या सर्वात मोठ्या अशा कदुना इलेक्ट्रिक कंपनीशी व्यापाराबाबत परस्पर सामंजस्य करार केला. आयमाचे अध्यक्ष ललित बूब यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
कदुना इलेक्ट्रिकचे अध्यक्ष व वरिष्ठ शासकीय अधिकारी अमिनो अबूबकर सुलेमान तसेच या कंपनीचे चार जणांच्या शिष्टमंडळाने आकांक्षा पॉवर अँड इन्फ्रास्ट्रक्चर लि. (सातपूर) या कंपनीबरोबर पुढील पाच वर्षांसाठी १० ते १५ दशलक्ष डॉलर एवढा मोठा मेंटेनन्स व सप्लायचा करार केला.
या ऐतिहासिक क्षणासाठी आकांक्षा पॉवरचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. आर. एन. बस्तिया व एमडी मोहपात्रा तसेच या करारात डेटा सेंटर इन्फ्रास्ट्रक्चर उभारणारी तिसरी घटक कंपनी विज्ञान लॅबसचे संचालक श्रीनिवासन हे सुद्धा उपस्थित होते. कदुना कंपनीने आयमाबरोबर औद्योगिक सामंजस्य करारही केला.
हा करार आयमाचे अध्यक्ष ललित बूब व कदुना इलेक्ट्रिकचे चेअरमन यांच्यात झाला. या करारामुळे नाशिकमधील इलेक्ट्रिकल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चर करणाऱ्या कंपन्यांना थेट नायजेरियात लागत असलेल्या सामग्रींची मागणी
वेळोवेळी ही कंपनी आयमाला कळविणार आहे. नाशकातील इलेक्ट्रिकल कंपन्यांसाठी ही एकप्रकारे पर्वणीच म्हणावी लागेल. नायजेरियात पाच मेगा व्हॅटचे सोलर प्लांटही उभारण्याचे कॉन्ट्रॅक्ट नाशकातील आकांक्षा पॉवर या कंपनीला दिल्याचे कदुना इलेक्ट्रिकच्या चेअरमन यांनी सांगितले. त्याचबरोबर नायजेरियात उपलब्ध असलेल्या अन्य विविध व्यापार संधीची माहितीही त्यांनी दिली. या कार्यक्रमाचे नियोजन घडवून
आणल्याबद्दल आकांक्षा पॉवर आणि कदुना कंपनीने आयमाचे अध्यक्ष ललित बूब व सहसचिव हर्षद बेळे तसेच आयमाचे आभार मानले. सूत्रसंचालन आयमाच्या आयात-निर्यात कमिटीचे अध्यक्ष जगदीश पाटील यांनी केले. यावेळी आयमाच्या सहसचिव योगिता आहेर, कार्यकारीणी सदस्य दिलीप वाघ, रवींद्र झोपे, श्वेता चांडक, जयंत पगार, राहुल गांगुर्डे, अविनाश मराठे, अजय यादव, मनिष रावल, वेदांत राठी, रणजीत सानप आदी उपस्थित होते. आभार हर्षद बेळे यांनी मानले.
