तरूणाईच्या बहरात रोमरोमात सळसळ
मनतळी खळबळ जणू धुमसती विस्तावळ अस्मितेची खुमखुमी असे ते चळवळीचे प्रहर
झेंडा फडके खांद्यावर नि गीतं क्रांतीचे ओठांवर
भेदांचे पलिते भोवती नि आसवांचे डोह दाटलेले
हाती बँनर विद्रोहाचे नि आंगोपांग अंगार साठलेले
होई एल्गार रस्तोरस्ती छाव्यांनी कफन बांधलेले
नि हरेक न्यायाच्या दाराशी मोर्चाचे रक्त सांडलेले
जात्यांधाना सलती मग विटंबती पुतळे युगंधराचे
बांधापलिकडील दंगेखोर घेती बळी बुध्दांकुरांंचे
पोलिसी जाच रातभर देही मुक्या शिनकांचा कहर
चित्यांनी साहिला लाठीमार प्राशीत वेदनांचे जहर
ते धम्मधरांचे प्रबोधन मेळे जणू प्रज्ञावंतांचे सोहळे
भासती जागते जागले जणू रातव्यात डोळस डोळे
जिवा-शिवावर झुंजारांनी केली निछावर जिंदगांनी
मुक जखमांचा कैवार शिरावर हेच त्यांचे अन्नपाणी
राहिले रांडके कुणी बेनाम कुणी बेमौत हलाल झाले
तडीपारीने कुणी करपले, कुणी तुरुंगात फकाट झाले
कुणी द्वेषाने जळाले नि वेड्यांनी गळी फास आवळले
मानव्यास्तव उद्ध्वस्त पँथर हेच तयांचे चरित्र जाहले
भाटांनी सातबारे चोरून 'स्व'चे पॅंथरीपण सिद्ध केले
डोईचे लोनी चाखत बुजगावने चळवळीचे बाप झाले
उथळ खळखळाट झाला लाऊड बोथट झाली हत्यारे
चित्याचे रुप पांघरूण कळपात हिंडती पाळीव वान्नरे
कवी - गंगाधर अहिरे, नाशिक
संवाद: ९४२२७६१४०४
