येशू ख्रिस्ताने उत्तम शुक्रवारी (गुड फ्रायडे) जगाला क्षमेचा धडा घालून दिला.त्या क्षमेचे सौंदर्यमूल्य मांडणारा विचार.निर्मितीनंतरची कलाकृतीच्या मूल्यमापनाची परिमाणे म्हणजेच सौन्दर्यशास्त्र,असे साहित्यिक परिप्रेक्षातून म्हणता येईल.जीवनाच्या परिप्रेक्षातून, जीवनशास्त्र म्हणजेच सौन्दर्यशास्त्र असेही म्हणता येईल, कारण जीवनमूल्य वगळता साहित्यमूल्य शून्य ठरते.
क्षमा ही सुंदर आहे याबद्दल दुमत नसावे.क्षमा दुर्बलतेचे प्रतिक नाही.क्षमेसाठी आवश्यक असते दुर्दम्य आत्मिक बळ.जो आपल्याच मारेकऱ्याला क्षमा करतो तो मारेकऱ्याहून प्रबळ असतो.दयेच्या आणि अहिंसेच्या अगाध क्षमतेची अनुभूती, प्रत्यय क्षमेत येतो.क्षमा हे सहनशीलतेला आव्हान नव्हे, क्षमेत मानवतेचे आवाहन आहे.
अपराध्याला त्याच्या अपराधाचे परिणाम भोगावेच लागतात.परिणामी त्याचा क्षय, विलय, विनाश निश्चित आहे. मनुष्य पापी आहे म्हणून त्याचा विनाश, मरण अटळ आहे. पापाचे वेतन मरण आहे, हा जुना सिद्धांत ख्रिस्ताने आपल्या मृत्यूने मोडीत काढला आणि नवा सिद्धांत मांडला:मर्त्य मानवाला क्षमेत सार्वकालिक जीवन आहे.अपराध्याबद्दलची मनातील कटुता मन सदैव अस्वस्थ ठेवते. मन पोखरत राहते.मनातला विकार बाहेर टाकला जाणे यालाच ॲरीस्टॉटलने कॅथार्सिस म्हटले आहे. करंदीकरांनी त्याला विरेचन असा शब्द वापरला आहे. ही एक मानसशास्त्रीय प्रक्रिया आहे. विरेचनाने मन शुद्ध होते, पवित्र होते, सुंदर होते.
क्षमा हा शब्द क्ष+मा अर्थात ‘क्षय’ आणि ‘नको’ (मा) म्हणजेच ‘मा क्षय’ असा तयार झाला आहे. ‘हानी होऊ देऊ नको (नये)’ हा त्याचा अर्थ आहे. हा केवळ शब्दार्थ आहे, या शब्दात मानव कल्याणाची उत्कट इच्छा, सद्भावना अनुस्यूत आहे. या इच्छेस कृतीची जोड मिळते तेव्हा तो सिद्धांत होतो आणि कृती पूर्ण होताच तो सिद्ध होतो.
क्रुसावर हातापायात कुऱ्हाडी खिळे ठोकलेल्या स्थितीत, मरणासन्न अवस्थेत असतानाही ख्रिस्ताने आपल्या अपराध्यांसाठी स्वर्गीय पित्याकडे,परमेश्वराकडे केलेली क्षमेची याचना म्हणजे येशू ख्रिस्ताने मांडलेला क्षमा सिद्धांत आहे.हा क्षमा सिद्धांत कृतीशील, सक्रीय आणि सकारात्मक आहे. क्षमा केवळ विचाराने अथवा उक्तीने होत नाही. त्यासाठी कृतीची जोड आवशयक आहे.
आपल्या जीवनात ख्रिस्ताने क्षमा सिद्धांत पुनःपुन्हा मांडला आणि अखेरीस तो कृतीत आणला, सिद्ध केला.
याच सिद्धांताचे विवेचन अधिक सोप्या शब्दात ख्रिस्ताने केले आहे. “लोकांनी तुमच्याशी जसे वर्तावे अशी तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही त्यांच्याशी वर्तन करा”(मत्तय ७:१२). कोणी आपल्याला ताडन करावे असे आपल्याला कधीच वाटत नाही. मग आपण का कोणाला छळावे, दुखवावे! प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या शारीरिक अथवा मानसिकदृष्ट्या का इजा पोहचवावी! हेच न्यायतत्व ख्रिस्ताने पापी स्त्रीला (वेश्या) धोंडमाराने मृत्यदंड देण्यास जमलेल्या तथाकथित न्यायकर्त्यांच्या हाती सोपविले.ख्रिस्त म्हणाला: “तुमच्यापैकी ज्याने कोणताही अपराध केला नाही त्याने प्रथम दगड मारावा”. आपल्या हातातील दगड टाकून एकेक करून सर्वच निघून गेले, तेव्हा ख्रिस्ताने त्या स्त्रीला म्हटले, “जा या पुढे पाप करू नको”. त्या स्त्रीने या प्रसंगानंतर आपले आचरण सुधारले, आपला जीवनमार्ग बदलला, असे बायबलमध्ये लिहिले आहे.
अपराध्याला आपल्या दुष्कृत्याची जाणीव होणे ही त्याच्या नव्या जीवनाची सुरवात आहे. त्या जाणीवेनंतरच त्याच्यात परिवर्तन होते. हे परिवर्तन शिक्षेपेक्षा क्षमेमुळे प्रकर्षाने होते.क्षमेमुळे अपराध्याचे लौकीककेतून अलौकीकतेत, स्वार्थातून परमार्थात परिवर्तन होते. वाल्याचा वाल्मिकी झाला तो असाच.
ऑन आय फॉर ऑन आय मेक्स द होल वल् ब्लाइंड’ हे अटेनबरोच्या गांधींचे वाक्य एक निर्विवाद सत्य सांगते, विवेकी कृतीची अपेक्षा व्यक्त करते. क्षमाशीलतेतूनच अहिंसेचा उगम होतो. पूर्ण जगावर सत्ता गाजविणारी इंग्रजांची दमनकारी सत्ता अहिंसायुक्त क्षमतेने नष्ट करून क्षमा सिद्धांत गांधीनी सुद्धा सिद्ध करून दाखवला.
दोन हजारांहून अधिक वर्षांपूर्वी तत्कालीन इराकमधील, आजच्या इज्राएलमधील कालवरी टेकडीवर दोन चोरांच्यामध्ये राजद्रोहाच्या आरोपाबद्दल मृत्युदंड भोगत असताना अनन्वित शारीरिक यातनांनी क्रूसविव्हळ झालेल्या ख्रिस्ताने उच्चारलेले पहिले महावाक्य आज जगभरातील सर्वच भाषांमध्ये वाक्प्रचार बनून अजरामर झाले आहे, मरणास मारून अमर झालेल्या ख्रिस्ताप्रमाणे. हे महावाक्य आहे, “हे बापा यांना क्षमा कर कारण हे काय करत आहेत हे त्यास काळात नाही”. ख्रिस्ताने एकूण ७ महावाक्ये उच्चारली. ही महावाक्ये सुसंस्कृत समाजासाठी त्रिकालाबाधित जीवनमूल्ये आहेत.
सुधीर शालिनी ब्रह्मे
sudhir.brahme@gmail.com
9923166176
