उष्णलहरींच्या पार्श्वभूमीवर पशुधनाच्या सुरक्षिततेसाठी काळजी घेण्याचे निर्देश
नाशिक (दिनकर गायकवाड)
उन्हाळ्यामुळे सध्या राज्यभरात तापमान झपाट्याने वाढत असून उष्णलहरींचा इशारा हवामान खात्याकडून दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद नाशिकच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने सर्व पशुपालकांना आपल्या पशुधनाच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.संजय शिंदे यांनी दिली.
डॉक्टर शिंदे यांनी केलेल्या माहितीनुसार,उष्णलहरींच्या काळात पशुधनास त्रास,आजार आणि मृत्यू होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे खालील उपाययोजना अमलात आणणे गरजेचे आहे:-
स्थानिक हवामानाचा अंदाज आणि दैनंदिन तापमानावर लक्ष ठेवावे.चारा व वैरणाचा पुरेसा साठा ठेवावा. पशुखाद्यांमध्ये आवश्यक क्षार व जीवनसत्त्वांची भर टाकावी. दुभत्या जनावरांना संतुलित आहार द्यावा, दुभत्या जनावरांचे सायंकाळचे दूध काढण्याची वेळ टप्प्याटप्प्याने किमान १ तास उशिराने ठेवावी, आधुनिक गोठ्यांमध्ये स्प्रिंकलरची सोय करावी, इतरांनी जनावरांवर पाणी शिंपडावे किंवा म्हशींसाठी पाण्यात बसण्याची सोय करावी, शेतीसाठी वापरली जाणारी जनावरे दुपारी १२ ते ४ या
वेळेत विश्रांतीस ठेवावीत त्यांना सावलीत ठेवावे,स्वच्छ व थंड पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करावी,पाण्याची भांडी स्वच्छ ठेवावीत, पाण्याची सोय गोठ्याजवळ व सावलीत करावी. आवश्यक असल्यास शेड उभारावे, अश्ववर्गीय जनावरांवर पायाकडून शरीरावर थंड पाणी
शिंपडावे, गाभण जनावरांना पुरेसा आहार द्यावा, डुकरांसाठी स्वच्छ निवारा, पाणी व पाण्यात बसण्याची सोय करावी, कुक्कुटपालनासाठी वातानुकूलित पक्षीगृह असल्यास उत्तम. नसल्यास गवताचे अच्छादन व पाणी शिंपडण्याची व्यवस्था करावी, खेळती हवा राखावी, पाळीव जनावरे शक्यतो घरात ठेवावीत, निवाऱ्यासाठी उष्णता प्रतिबंधक साहित्याचा वापर करावा.
जनावरे उघड्यावर, उन्हात बांधू नयेत, पाळीव प्राणी गाडीत बंद करून ठेवू नयेत, शेतीकामासाठी जनावरे उन्हात वापरू नयेत, पिण्याच्या पाण्यासाठी फार दूर चालावे लागू नये, याची दक्षता घ्यावी, जनावरांची गर्दी करू नये, दाटीवाटीने बांधू नये, भर उन्हात वाहतूक करू नये, उन्हे असल्यास दुभत्या जनावरांचे दूध काढू नये, मृत जनावरे उघड्यावर टाकू नयेत. पशुपालकांनी ही काळजी घेतल्यास उष्णलहरीमुळे पशुधनाच्या आरोग्यावर होणारा परिणाम टाळता येईल आणि उत्पादनात सातत्य राखता येईल, असे डॉ. संजय शिंदे यांनी सांगितले. जिल्हा परिषद नाशिक पशुसंवर्धन विभाग सर्व पशुपालकांना या काळात आवश्यक ती मदत करण्यास सज्ज आहे.
