नाशिक (दिनकर गायकवाड)
शहर परिसरात सोनसाखळी चोरीचे प्रकार सुरूच असून, वेगवेगळ्या ठिकाणांहून चार महिलांच्या गळ्यांतील सुमारे लाखो रुपयांचे दागिने अज्ञात चोरट्यांनी बळजबरीने खेचून नेल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.
गळ्यातील सोन्याची साखळी चोरीचा पहिला प्रकार गणेशवाडीत घडला.फिर्यादी पूजा दुर्गेश शिंदे (रा. कृष्णनगर, आडगाव नाका) या गणेशवाडीतील कृष्णनगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला उभ्या राहून रामरथ व गरुडरथाच्या दर्शनासाठी आल्या होत्या.
तेथे असलेल्या गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने शिंदे यांच्या गळ्यातील १२ हजार रुपये किमतीचे तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र व त्यांच्यासोबत असलेल्या वर्षा रामदास देवरे यांच्या गळ्यातील २४ हजार रुपये किमतीची सहा ग्रॅम वजनाची सोनसाखळी खेचून नेली. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात
अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार काळे करीत आहेत.
सोनसाखळी चोरीचा दुसरा प्रकार गंगापूर रोड येथे घडला. फिर्यादी पवनकुमार बाबूलाल कुमावत (रा. विवेकानंदनगर, गंगापूर) हे व त्यांची मुलगी जयश्री कुमावत हे आईस्क्रीम घेऊन घराकडे जात होते. त्यावेळी एका मोटारसायकलीवरून आलेल्या दोन अनाळखी तरुणांनी कुमावत यांच्या उजव्या बाजूने येऊन ऊन पाठीमागे बसलेल्या इसमाने कुमावत यांच्या गळ्यावर थाप मारून त्यांच्या गळ्यातील ६४ हजार ५०० रुपये किमतीची साडेतीन तोळे वजनाची सोन्याची चेन जबरीने खेचून संत कबीरनगरच्या दिशेने भरधाव पळून गेले. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अहिरराव करीत आहेत.
गळ्यातील सोने चोरीचा तिसरा प्रकार कॉलेज रोड येथे घडला. फिर्यादी शीतल नितीन जाधव (वय ३२) या दि. ७ एप्रिल रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास कृषीनगर जॉगिंग ट्रॅककडून पती व मुलासह घराकडे पायी जात होत्या. त्यावेळी समोरून मोटारसायकलीवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांपैकी पाठीमागे बसलेल्या इसमाने जाधव यांच्या गळ्यातील साडेबारा तोळे वजनाचे १ लाख ७ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून नेले. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार मोहिते करीत आहेत.
