एक दिवस सलामी,वर्षभर गुलामी
जयंती करणार असाल तर ती एक दिवसाची नसते. जयंती साजरी करणाऱ्याला पुढच्या रोजच्या दिवसाचं व्रत घ्यावं लागतं.ज्या महामानवांची जयंती आपण करतोय त्यांनी ३६५ दिवस आणि २४ * ७ क्षणोक्षणी नव्याने जन्म घेतला.मिनिटामिनिटाला व्यवस्था बदलवण्यासाठी नवीन जन्माला घातले, त्यासाठी स्वत: रोज मरून रोज नवा जन्म घेतला.
बुद्ध म्हणतात " मी काल जो होतो, तो आज नाही,मी कालच्या पेक्षा आज वेगळा आहे.काल जो होतो तो इतिहास झाला,मी आज नव्याने जन्म घेतला आहे. कालच्या अनुभवातून मी आज माझ्यात बदल केला आहे.काल मला कोण काय बोललं हे आजच्या मला लागू होत नाही.माझ्या सोबत फक्त ज्ञान येतं. ज्ञान सत्य आहे. सत्य चिरंतन आहे.ज्ञान सत्याच्या कसोटीवर घासून घ्यावं लागतं.जे सत्याच्या कसोटीवर उतरत नाही ते सोडून द्यावं लागतं.अत्त दीप भवं. स्वत:च स्वत:चा प्रकाश व्हा. मी सांगितलं म्हणून विश्वास ठेवू नका.मी सांगितलं ते सत्याच्या कसोटीवर घासून पहा"
हा दृष्टीकोन आमच्या पर्यंत पोहोचवणारे बाबासाहेब. बाबासाहेबांनी ज्यांना गुरू मानलं ते महात्मा ज्योतिबा फुले. त्यांना साथ देणारी सावित्री माई. बाबासाहेबांच्या कठीण काळात त्यांना आधार देणारी माता रमाई. तुटपुंज्या पैशात महामानवाचं बिर्हाड सांभाळणारी रमाई.
यांची जयंती हे व्रत असतं.हे सेलिब्रेशन नाही.
आपल्यात रोज बदल घडवायचं व्रत आहे. खडतर मार्गावर चालण्याची शपथ आहे.
या मंडळींचं स्मारक म्हणजे दगडवीटांची इमारत नाही. तर यांचा मार्ग अनुसरणे हे स्मारक आहे.त्यांचा विचार समजून घेऊन तो पुढे नेणे हे स्मारक आहे.
एक दिवस जयंती करून ३६४ दिवस प्रस्थापितांच्या दावणीला चळवळ बांधणारे दलाल हे करू शकत नाहीत, महात्मा फुले यांचं मिशन आपल्याला तोंडपाठ असायला हवं. त्यांच्या पहिल्या शाळेची तारीख आणि त्याचे पुरावे शोधून काढणे, ते प्रकाशित करणे हे त्यांचे स्मारक आहे.बाबासाहेबांच्या बाबतीतले त्यांचे पहिल्या गोलमेज परीषदेपासूनचे ते अखेरच्या दिवसापर्यंतचे त्यांचे आरक्षण, सेपरेट सेटलमेंट, क्रांती- प्रतिक्रांती आणि विठ्ठल हाच बुद्ध असे प्रकाशित अप्रकाशित लिखाण शोधून पुराव्यांसहीत प्रसिद्ध करणे हे त्यांचे स्मारक आहे.
ही स्मारके घरोघरी पोहोचवणे, त्यासाठी स्वत:ला झोकून देणे ही त्यांची जयंती आहे. कारण हे तर रोज जन्मले आहेत.रोजच्या खस्ता खाऊन त्यातून रोज त्यांनी फिनिक्स पक्षाप्रमाणे नवा जन्म घेतला आहे. अडचणींवर मात करून नवा मार्ग शोधला.म्हणून आपण आहोत.एक दिवस जयंती करून ऋणातून मुक्त होता येत नाही. हा शॉर्टकट मारता येत नाही.
तुम्ही एक दिवसाची जयंती करा किंवा न करा, तुम्हाला महामानवांच्या ऋणातून मुक्त होता येत नाही.ते बोलून दाखवून मुक्त होता येत नाही.तुमच्या जगण्याला ज्यांनी अर्थ दिला, त्यांचे काम पूर्ण करण्यासाठी खारीचा का? होईना वाटा उचलणे, त्यासाठी रोजच्या रोज मरण्याची तयारी ठेवणे ही जयंती आहे.
११ एप्रिल असेल किंवा १४ एप्रिल ही त्यांनी भौतिकदृष्ट्या जगात प्रवेश करण्याची तारीख आहे, म्हणून या दिवशी तुम्ही झोकून देण्याचा संकल्प करण्यासाठी जयंती साजरी करणार असाल तर तुमचे स्वागत आहे. तरच जयंती साजरी करण्याला अर्थ आहे.
एक दिवस सलामी आणि इतर दिवशी गुलामी यासाठी जयंती करणार असाल तर तुम्ही स्वत:ला फसवू शकणार नाही. तुम्ही महामानवांना फसवू शकत नाही.ज्या वेळी पुतळ्याला हार घालायला जाल त्या वेळी त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बघा, एक दिवसाची जयंती करायला तुमचं लेकरू आलंय बाबा,असं सांगून बघा.
हे तुम्ही सांगू शकता ?
एक दिवसाची जयंती आणि इतर दिवशी विश्रांती ,ते बाबांचं लेकरू असू शकत नाही.
ते आईबापाला धोका देणारं लेकरू होय.आईबाप अशा लेकराला माफ करू शकत नाहीत.
आजवर आपण जयंतीच साजरी केली.बाबांनी जे आपल्याला दिलं ते आपण राखू शकलो नाही.
नेत्यांना दोष देऊन मोकळं होणं हे आपलं निर्ढावलेपण आहे.आपण बाबांची पुस्तकं वाचली नाहीत तर आपण इतरांना काय सांगणार ?त्यांनी दिवसाची रात्र करून ही ग्रंथसंपदा निर्माण केली.
स्वत:चं स्मारक निर्माण केलं.आपल्यासाठी लढा देत असताना झोपेचा त्याग करून लिखाण केलं.त्यामुळे दुर्धर आजार ओढवून घेतले. मधुमेह जडला. तो बळावला.
आणि आपण ही ग्रंथसंपदा वाचत नाही. कुणी वाचायला सांगितलं तर "आम्हाला समजत असतं तर " असा पवित्रा घेतो.
पोरं जन्माला कशी घालायची हे कुणी शिकवावं लागत नाही . जगात आल्यावर सगळं समजतं, शिकता येतं.
चळवळीतले कुणीच आभाळातून पडलेले नाहीत. ज्यांनी वाचलं ते तुमच्या प्रमाणेच होते.
त्यांना बाबासाहेब नीट समजले .
बाबांची पुस्तकं वाचली तर त्यांनी आपल्याला जे दिलं ते कसं दिलं हे समजेल. ते राखायचं कसं याची समज येईल.
आपण ते केलं नाही. आपण आपल्याला बाबासाहेब सांगणार्या उच्चवर्णियांवर बाबासाहेब सोडून दिले. आपण जयंतीला त्यांना पैसे देऊन बोलावले. त्यांना आपले राजे बनवले आणि त्यांना मतं देऊन त्यांची गुलामी केली.
आपण स्टेज सजवलं, वर्गणी काढली आणि तिथे तोंडदेखले बाबासाहेब सांगणार्यांना बोलावून त्यांना आपल्यावर लादून घेतलं. त्यांनी बाबासाहेब वाचले आणि आपल्याला त्यांच्या सोयीने सांगितले आपण ते स्विकारले. कारण आपण वाचले नाहीत. आपला पैसा.आपलं स्टेज, आपले मतदार आपण त्यांना फुकटात दिले, वरून बिदागी दिली.
आणि आता तर त्यांना एव्हढं गब्बर बनवलं कि आता त्यांच्या पैशांनी जयंती चालते. उपकृत व्हायची स्पर्धा भरलीय. उपकृत झाल्यावर त्याची परतफेड म्हणून निवडणुकीत मतांची बेगमी करायची स्पर्धा भरलीय. ही मतांची झोळी भरून देण्यासाठी स्पॉन्सर्ड जयंतीचे दलाल निर्माण झाले आहेत. त्यांचे फोटो झळकत आहेत.
आमचे आरक्षण संपले. शिक्षण महागले. आरोग्य सेवा महागल्या. कामाचे तास वाढले. पगार कमी झाले. बेरोजगारी वाढली. आम्ही परावलंबी झालो. ही गुलामी आली. पण आमच्या जयंतीला आम्ही यावर बोलायला तयार नाही.मग आम्ही बाबांच्या डोळ्यात डोळे घालून काय सांगणार?
मंदार माने
