नाशिक (दिनकर गायकवाड) देशातील १४० हून अधिक जातींच्या लोकांना लाभ देण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरू केली आहे.या योजनेद्वारे कारागिरांना कमी व्याजदरात ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाणार आहे.या योजनेत १७ हून अधिक कारागीर आणि पारंपरिक कामगारांचा सहभाग आहे;मात्र लासलगाव येथील या योजनेचे ४६५ लाभार्थी वंचित राहिल्याने हि योजना येथे फसली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
कारागिरांना आर्थिक स्थैर्य आणि आत्मनिर्भरता प्राप्त करण्यासाठी मोदी सरकारकडून प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेच्या लाभामुळे लाभार्थ्यांना त्यांचे आर्थिक कल्याण आणि जीवनमान सुधारण्याची संधी मिळणार आहे.या योजनेच्या माध्यमातून बेरोजगारी कमी करण्यात आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होण्यास मदत होणार आहे.असे असले तरी लासलगाव येथील सुमारे ४६५ लाभार्थी या योजनेच्या लाभापासून वंचित राहिले असल्याची माहिती जयदत्त होळकर यांनी दिली आहे.
ही योजना सुरू झाल्यापासून लासलगाव येथील या योजनेमध्ये अर्ज दाखल केलेले लाभार्थी वंचित राहिलेले आहेत.पीएम विश्वकर्मा योजनेचे अर्ज ऑनलाईन वेबसाईटचा वापर करून करण्यात येत असतो.
ऑनलाईन अर्जाची पडताळणी करण्यासाठी सरपंच यांना आयडी पासवर्ड तयार करून वापरण्याबाबत सूचना करण्यात आलेल्या आहेत;परंतु लासलगाव येथील सरपंच कॅटेगरीतील आयडी पासवर्डसाठी रजिस्टर करताना प्राथमिक माहिती भरून प्रोसेस केल्यानंतर असा तांत्रिक एरर येत आहे.त्यामुळे लासलगांव येथील शेकडो लाभार्थी या योजनेच्या लाभापासून सुरुवातीपासून वंचित राहिलेले आहेत.
याबाबत जयदत्त होळकर यांनी दिनांक ११ ऑक्टोबर २०२४ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी पत्राद्वारे कळविलेले होते; परंतु अद्यापपर्यंत याबाबत कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही. पीएम विश्वकर्मा योजनेद्वारे १७ प्रकारपेक्षा जास्त कॅटेगरीतील कारागिरांना आपला व्यवसाय सुरू करण्यास आर्थिक सहाय्य मिळणार आहे.
यामुळे या कारागिरांचे आर्थिक कल्याण आणि जीवनमान उंचावण्यासाठी,तसेच ग्रामिण बेरोजगारी कमी होऊन रोजगाराच्या नवी संधी निर्माण होणार आहे.त्यामुळे आयडी पासवर्ड बाबत निर्माण झालेली तांत्रिक अडचण तत्काळ दूर करून लाभार्थ्यांना न्याय द्यावा,अशी मागणी जयदत्त होळकर यांनी केली आहे.
