मुंबई सिटीलाईन मिडिया नेटवर्क
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या अपघातामध्ये दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,चिंचवड येथे काम करणारे हे दोन्ही भाऊ कामावरून सुटल्यानंतर नेहमीप्रमाणे एकाच दुचाकीवरून घरी परतत होते.
त्यावेळी काळाने घाला घातला. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे योगेश राजोरिया (वय ३४) आणि दीपक राजोरिया (वय ३१), रा. पारशीचाळ, देहूरोड अशी आहेत. योगेश आणि दीपक हे चिंचवड येथे कामाला होते. नेहमीप्रमाणे काम संपल्यानंतर दोघेजण दुचाकीवरून घराकडे परतत होते. त्यावेळी गार्डनर
सिटी गेटजवळ दुचाकी घसरली अन् भीषण अपघात झाला. अपघात इतका गंभीर आणि भयंकर होता की, दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामध्ये दीपक आणि योगेश या भावांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच देहूरोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला.
नागरिकांच्या मदतीने दोन्ही मृतदेह पोस्टमार्टमसाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पाठवण्यात आले.
दरम्यान,दोन सख्ख्या भावांचा एकाच वेळी मृत्यू झाल्यामुळे पारशीचाळ आण देहूरोड येथे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. राजोरिया कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळलाय.
