पास्का सणानिमित्ताने पवित्र मिस्सा बली अर्पण
श्रीरामपूर दिपक कदम नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील ख्रिस्त राजा चर्च मध्ये ईस्टर (पास्काचा) सण मोठ्या उत्साहात साजरा झाला.
पवित्र संगीत मिस्सा बलिदानाचे मुख्य याजक व प्रवचनकार रेव्ह. फा.भाऊसाहेब संसारे, रेक्टर व निरोप्या संपादक पेपल सेमिनरी, पुणे हे होते.त्यांच्या समवेत धर्मग्राम प्रमुख धर्मगुरू फा. अब्राहाम रणन्नवरे व फा झेवियर पाटील हे होते.
फा.भाऊसाहेब आपल्या प्रवचनात म्हणाले,आपल्या सर्वांचे परिवर्तन झाल्याशिवाय पुनरुत्थित प्रभू येशूचा आनंद भेटणार नाही. प्रत्येक पास्काच्या किंवा नाताळच्या सणाला आपल्यातला एक एक दुर्गुण कमी केला पाहिजे आणि प्रभू येशू सारखा सद्गुण दयाळू, क्षमाशील, नम्रपणा अंगी बाळगला तर निश्चितच ईस्टरचा सण साजरा झाल्यासारखे होईल.
येशू मरण पावल्यानंतर शिष्य भयभीत झाले होते.त्यांना वाटले की आपल्याला देखील येशू सारखे मारतील. परंतु येशू तिसऱ्या दिवशी मरणातून पुन्हा उठून विजय मिळवला व सर्व प्रथम महिलेला (मरिया माग्दलेन) दर्शन दिले आणि मग सर्व शिष्यांना.आपण सर्वजण येशूचे अनुयायी, शिष्य व प्रेषित होऊ शकतो त्यासाठी फक्त जीवनामध्ये दहा आज्ञांचे पालन करणे महत्त्वाचे आहे.
पुढे ते म्हणाले, कितीही मोठा अंधार असो, देव नेहमी त्या अंधारातून प्रकाश निर्माण करतो.कितीही खोल वेदना असो, देव त्यातून आपल्याला नवजीवन देतो.आज ईस्टरच्या दिवशी फक्त येशू मरणातून उठला याचीच जाणीव ठेवू नये, तर आपणही आपल्या जीवनाच्या अंधारातून, हरवलेल्या आशेतून उठूया व नवीन जीवनाला सुरुवात करूया.
बाप्तिस्मा, अग्नी, पाणी, पवित्र आत्मा व सृष्टी यावर देखील त्यांनी प्रवचन दिले.पवित्र संगीत मिस्सा बलिदानासाठी गायन मंडळ पिटर बारगळ, मकासरे गुरुजी, भाऊसाहेब पाटोळे व सहकारी यांनी सहकार्य केले.यावेळी धर्म ग्रामातील मुलां मुलींना फा. भाऊसाहेब संसारे यांच्या हस्ते प्रथम ख्रिस्त शरीर देण्यात आले.
धर्मग्रामाच्या वतीने फा.भाऊसाहेब यांचा सत्कार पिटर बारगळ, संतोष गाढवे, डॉ. संदेश चक्रणारायण, सचिन बनसोडे, करण गायकवाड, कोमल बोधक, तेरेसाबाई आढाव, निता आल्हाट व सुनील पाडळे यांनी केला. फा.अब्राहाम यांनी सर्व पास्का सणाच्या देणगीदांचे विशेष आभार मानले.
शरद आल्हाट, सुभेदार शिरसाठ, पटेकर गुरुजी, गुलाब साळवे, विजय गाढवे, अंतोन भालेराव, सेंट ॲनिज हॉस्पिटल सिस्टर्स, सेंट जोसेफ स्कूल सिस्टर्स यांचे देखील सहकार्य लाभले.पवित्र मिस्सा बलीदान नंतर भाविकांसाठी प्रितीभोजनचे आयोजन करण्यात आले होते. सणासाठी विविध खेड्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
