खुनाचा गुन्हा दाखल
नाशिक दिनकर गायकवाड
नाशकातील सातपूरला एका टोळक्याने धारदार शस्त्राने वार केल्यामुळे जखमी झालेल्या युवकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी याबाबत दिलेली अधिक माहिती अशी,की एका टोळक्याचा सातपूर परिसरातील करण नामक इसमाशी दि. १० एप्रिल रोजी रात्री वाद झाला होता. या वादाची कुरापत काढून या टोळीतील काही जण कार्बन नाका परिसरात राहणाऱ्या करणच्या घराजवळ आले होते.
यावेळी मारहाण सुरू असताना टोळक्याने प्रकाश सूर्यवंशी यांच्यावर प्राणघातक शस्त्राने हल्ला केला.या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने सूर्यवंशी यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. काल दिवसभर त्यांची प्रकृती स्थिर होती; मात्र रात्री त्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.या टोळीतील आरोपींची नावे निष्पन्न झाली असून, त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत.
