नवी दिल्ली (सिटीलाईन न्यूज नेटवर्क)
ईडीने पहिले आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये सोनिया गांधी,राहुल गांधी,सॅम पित्रोदा आणि सुमन दुबे यांची नावे आहेत.या कारवाईच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षातर्फे देशभरातील ईडी कार्यालयांबाहेर निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
काँग्रेसच्या नॅशनल हेरॉल्ड वृत्तपत्र आणि असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नुकतेच पहिले आरोपपत्र दाखल केले.देशभरातील आंदोलनाविषयीची माहिती काँग्रेसचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी दिली. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह हे विरोधकांना धमकी देण्याचे काम करत आहेत.
या प्रकरणाची सुनावणी २५ एप्रिल रोजी दिल्लीतील राऊस अव्हेन्यू कोर्टात होईल.न्यायालयाने ईडीकडून या प्रकरणाची केस डायरीही मागितली आहे. सन २०१२ मध्ये भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि त्यांच्या सहयोगी कंपन्यांशी संबंधित लोकांविरुद्ध या प्रकरणाची तक्रार केली होती. ईडीने दिल्ली, लखनऊ आणि मुंबईतील ६६१ कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी नोटीस बजावली होती. काल खासदार प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा हे ईडीच्या कार्यालयात पोहोचले गुरुग्रामच्या शिकोपूर जमीन घोटाळ्यात त्यांची चौकशी करण्यात आली.
