ठाणे विशाल सावंत-ठाणे येथील पावसाळी स्थितीची आढावा बैठक नुकतीच खासदार नरेश म्हस्के आणि ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी ठाण्यातील पावसाळी स्थितीचा आढावा घेत पार पडली.
या बैठकीच्या दरम्यान आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही आपत्कालीन कक्षास भेट दिली.ठाणे महापालिका आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार सध्या जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याकडे आहे. मुंबई- ठाणे परिसरात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर खासदार नरेश म्हस्के यांच्यासह जिल्हाधिकारी शिनगारे यांनी ठाणे महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षास भेट दिली.
यावेळी, त्यांनी महापालिकेचे सर्व उपायुक्त, सर्व प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त,कार्यकारी अभियंता यांची ऑनलाईन बैठक घेतली.आपत्ती व्यवस्थापन कक्षात झालेल्या या बैठकीस, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपायुक्त जी.जी. गोदेपुरे, मनीष जोशी,अनघा कदम, सचिन सांगळे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी आदी उपस्थित होते.या बैठकीनंतर, खासदार नरेश म्हस्के आणि जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कामाचा आढावा घेतला.
पहिलाच मोठा पाऊस असून नाल्यात साठणारा, डोंगर भागातून वाहून येणारा तरंगता कचरा तत्काळ काढण्यात यावा. तसेच, पाणी साठण्याची नेहमीच्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे असे निर्देश या बैठकीत खासदार नरेश म्हस्के यांनी दिले.
तसेच, नाले सफाईची कामे पूर्ण करणे, सी-वन गटातील अतिधोकादायक इमारती रिकाम्या करणे, आवश्यक ती रस्ते दुरुस्ती तत्काळ करणे आणि वृक्षांच्या धोकादायक फांद्यांच्या छाटणीचे काम जलद करणे या चार मुद्द्यांवर सगळ्यांनी अधिक लक्ष द्यावे. तसेच, नैसर्गिक आपत्ती ओढावली तर तत्काळ प्रतिसाद देणे, याला प्राधान्य देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी या बैठकीत दिले.
आपत्ती काळात संपर्क साधावा
ठाणे महापालिका क्षेत्रात कोणत्याही नैसर्गिक आपत्तीच्या काळात नागरिकांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी १८००-२२२-१०८/८६५७८८७०१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेने केले आहे.