जळगाव जिल्ह्यातील नैतिकतेचा ऱ्हास करणारी घटना
सिटीलाईन न्यूज नेटवर्क
रावेर-जळगाव जिल्ह्यात १६ वर्षांच्या संसारावर पाणी फिरवून १४ वर्षांचा मुलगा व १२ वर्षांची मुलगी यांचा विचार न करता ३४ वर्षीय विवाहिता गारखेडा (ता. जामनेर) येथे प्रियकरासोबत पुनर्विवाह करत असताना तो रोखण्यासाठी तिचा पती आईवडिलांसह धावून आला. परंतु,तिच्या प्रियकराने पतीला यावेळी चोप दिल्यांची घटना तालुक्यातील भोकरी शिवारातील श्रीक्षेत्र ओंकारेश्वर मंदिरात सोमवारी घडली.
जळगाव शहरातील माहेरवाशीण असलेल्या विवाहितेचा बहादरपूर (ता.पारोळा) येथील युवकाशी १६ वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना दोन अपत्ये आहेत. परंतु, पती व पत्नीत वादविवाद निर्माण झाल्याने विवाहिता दोन वर्षांपासून जळगाव येथे माहेरी विभक्त राहत होती.
दरम्यान, तिचे सूत जामनेर तालुक्यातील गारखेडा येथील तरुणाशी जुळले.त्या दोघांनी रावेर तालुक्यातील भोकरी, शिवारातील श्रीक्षेत्र ओंकारेश्वर मंदिरात सोमवारी शुभमंगल करण्याचा बेत आखला. ही खबर पतीला लागली.
अदखलपात्र गुन्हा दाखल
फारकत दिली नसताना वा कोणाचीही पूर्वसंमती घेतली नसताना पत्नी करीत असलेल्या पुनर्विवाहाचा बेत हाणून पाडण्यासाठी पती त्याच्या आई-वडिलांसोबत श्रीक्षेत्र ओंकारेश्वर मंदिरात धडकला.
त्यावेळी नवीन दादल्याने महिलेच्या पतीला व सासू-सासऱ्यांना मारहाण केली.त्या विवाहितेनेही शिवीगाळ करून त्यांना पिटाळून लावले. या प्रकरणी पहिल्या पतीने त्याची पत्नी व तिच्याशी पुनर्विवाह करणाऱ्या दादल्याविरुद्ध रावेर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
