नाशिक दिनकर गायकवाड-गोदाघाटावरील बुधवारच्या बाजारात १९ वर्षीय युवकाच्या खून प्रकरणी पंचवटी पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले आहे.या आरोपींपैकी दोन जण अल्पवयीन आहेत.
याबाबत पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत नंदलाल उर्फ सुरज जगतकुमार दास (वय १९ रा. सितागुंफा रोड, पंचवटी) हा काल आठवडे बाजारात वडिलांसोबत भाजीपाला घेण्यासाठी गौरी पटांगणावर उभा होता. त्यावेळी चार जण त्याच्याजवळून जात असताना त्याच्या खिशाला त्यांचा चुकून हात लागला. त्यामुळे दास याने त्यांना हटकले. नंतर त्यांच्यात वादावादी व धक्काबुक्की झाली.चौघांच्या टोळीतील एकाने त्याच्याजवळ असलेल्या धारदार शस्त्राने नंदलाल याला भोसकले आणि तेथून पसार झाले.
या घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.
त्यानंतर पंचनामा करण्यात आला.दरम्यान, जखमी नंदलालला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता अति रक्तस्त्राव झाल्याने उपचारादरम्यान त्याला डॉक्टरांनी मयत घोषित केले.
याप्रकरणी जगत दास यांच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर करीत आहेत. आरोपी हे फिरस्ते असून, नेहमी गोदाघाट परिसरात त्यांचा वावर असतो त्यांची चौकशी करून कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी येथील जनतेने केली आहे.