नाशिक (दिनकर गायकवाड): पोलीस असल्याची बतावणी करून एका इसमाची सोन्याची चेन व अंगठी लांबविल्याची घटना नाशकातील इंदिरानगर परिसरात घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की चंद्रकांत बाळकृष्ण धोंगडे (वय ५४, रा. राजीवनगर, नाशिक) हे काल सकाळी मॉर्निंग वॉकसाठी जात होते. इंदिरानगर परिसरातील आदित्य हॉलजवळ ते आले असता मोटारसायकलीवरून दोन अनोळखी इसम त्यांच्या जवळ आले. त्यांनी ते पोलीस असल्याचे सांगत धोंगडे यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची सोन्याची चेन व हातातील पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असा एकूण ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल ठकबाजी करून चोरून नेला. त्यांनी हा मुद्देमाल घेत पाथर्डी फाट्याच्या दिशेने पळ काढला. धोंगडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याच्या विरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार शेख करीत आहेत.
