नाशिक (दिनकर गायकवाड) नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी काल जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या कामाची पाहणी केली.इमारतीचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले असून विविध अंतर्गत कामांनाही गती मिळालेली आहे.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी फर्निचरच्या कामाची पाहणी केली. सद्यस्थितीत फर्निचरचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच ते पूर्ण होणार आहे त्याचबरोबर इमारतीच्या पहिल्या तीन मजल्यांवरील अंतर्गत कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.यामध्ये मुख्यत्वे करून फॉल सीलिंग, विद्युत प्रणालीचे काम तसेच पाणी
पुरवठ्यासाठी आवश्यक असलेल्या नळजोडणीचे काम तातडीने पूर्ण करावे, असे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले.
इमारतीतील विविध विभागांचे काम अधिक काटेकोरपणे आणि गुणवत्तेने पूर्ण करण्यासाठी प्रशासनामार्फत सातत्याने पाहणीकेली जात आहे.
या इमारतीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या विविध विभागांना एकत्रित आणि सुसज्ज कार्यालयीन व्यवस्था मिळणार आहे.यावेळी इमारती व दळणवळण विभाग क्र. १ चे कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे, वास्तुविशारद तसेच संबंधित बांधकाम ठेकेदार उपस्थित होते.
