अकोले प्रतिनिधी अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा गावाचे शूर भूमिपुत्र संदीप पांडुरंग गायकर यांनी भारतीय सैन्याच्या १५ मराठा बटालियनमध्ये सेवा बजावत असताना जम्मू-काश्मीर येथे दहशतवाद्यांशी लढताना देशासाठी वीरमरण प्राप्त केलं आहे.हि वार्ता कळताच दुःखद अंतःकरणाने ब्राह्मणवाड्यासह अकोले तालुका सुन्न झाला.
संदीप गायकर हे अत्यंत शिस्तबद्ध, कर्तव्यनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी सैनिक होते.आपले कर्तव्य बजावत असताना त्यांनी प्राणांची आहुती देऊन देशसेवा केली.त्यांच्या बलिदानाने संपूर्ण ब्राम्हणवाडा,अकोले तालुका आणि अहिल्यानगर जिल्हा शोकसागरात बुडाला आहे.
त्यांच्या शौर्याची आणि बलिदानाची आठवण संपूर्ण ब्राम्हणवाडा गाव तसेच अकोले तालुका आणि संपूर्ण देशाला सदैव अभिमानाने राहील.
संदीप गायकर यांच्या राष्ट्रसेवेचे उपकार गावकरी आणि संपूर्ण राष्ट्र कधीही विसरणार नाही. अशा वीर जवानाला ग्रामपंचायत ब्राम्हणवाडा, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी सर्व ब्राम्हणवाडा ग्रामस्थ आणि अकोले व संगमनेर तालुक्याच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली
