कंपनीवरील कर्ज कमी करण्याचे आश्वासन देऊन फसवणूक;सात जणांवर गुन्हा दाखल
नाशिक दिनकर गायकवाड कंपनीवर असलेले बँकेचे कर्ज कमी किमतीत तडतोड करण्याचे आश्वासन देऊन कंपनी चालक व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी मार्शल लेंरी रिचर्ड डिसोझा (रा. सिरीन मेडोज, गंगापूर रोड, नाशिक) यांचा कुक्कुटपालनाचा व्यवसाय आहे.डिसोझा यांचे वडील,काका व आत्या संचालक असलेल्या सी ॲण्ड एम फार्मिंग या कंपनीच्या नावे
असलेल्या मौजे मानोरी वणी ढकांबे, ता. दिंडोरी या ठिकाणी असलेल्या ३२६ एकर क्षेत्र असलेल्या मिळकती स्वतःच्या फायद्यासाठी गैरमार्गाने हडप करण्याच्या उद्देशाने आरोपी भगवान लेकराज प्रेमचंदानी याने कंपनीवर असलेले बँकेचे कर्ज कमी किमतीत तडजोड करण्याचे खोटे आश्वासन दिले.
बँकेचे कर्ज एआरसी कंपनीस हस्तांतरित करून एआरसी कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून कर्ज परतफेडीसाठी पाठविलेल्या नोटिशीवर मुदत संपण्यापूर्वीच कंपनीच्या मिळकती कोणालाही कोणत्याही किमतीस विकण्यास संमती देणारे फिर्यादीच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या खोट्या सह्या असलेले बनावट नोटरीकृत पत्र खरे आहे,असे भासवून ते सादर केले व त्याआधारे कंपनीकडून स्वतःचा मुलगा आरोपी नितेश प्रेमचंदानी,सती
प्रेमचंदानी (दोघेही रा. अंधेरी, पश्चिम) यांच्यासह इतर हितसंबंधित अनिल सोमनाथ घुमाळ, श्रीकृष्ण भास्कर गांगुर्डे (सर्व रा. नाशिक), सुशीलकुमार चिमणलाल शहा व शरद दत्तात्रय बाळ यांच्या नावे कंपनीच्या मिळकती कमी किमतीत खरेदी केल्या व मुद्रांक शुल्कही कमी भरून कंपनीचे आर्थिक नुकसान करून कंपनीसह शासनाची फसवणूक केली. हा प्रकार सन २०१४ पासून ते १५ मे २०२५ या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक व दिंडोरी येथे घडला.
या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध फसवणुकीबा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक चव्हाण करीत आहेत.