विकासवर्धिनीच्या प्रयत्नांना यश
अहिल्यानगर: " नीती आयोगाच्या अटल इनोवेशन मिशन अंतर्गत " अटल टिंकरिंग लॅब" उभारणीसाठी दहा शाळांच्या प्रस्तावांना मंजुरी मिळाली असून लवकरच या शाळांना प्रत्येकी १२ लाख रुपयांचे अनुदान प्राप्त होणार आहे, " अशी माहिती अहिल्यानगर येथील विकासवर्धिनी संस्थेचे संचालक .विनायक देशमुख यांनी दिली.
नीती आयोगाच्या "अटल इनोवेशन मिशनचे" संचालक डॉ. चिंतन वैष्णव यांच्या स्वाक्षरीने अटल टिंकरिंग लॅब साठी मंजुरी मिळालेल्या शाळांमध्ये अहिल्यानगर जिल्हा (४), बुलढाणा जिल्हा (३), जळगाव जिल्हा (१) , बीड जिल्हा (१) व पालघर जिल्हा (१) अशा दहा शाळांचा समावेश आहे.
या शाळांमध्ये प्रामुख्याने १) श्री संत निळोबाराय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, राळेगणसिद्धी, ता. पारनेर, जि.अहिल्यानगर, २) वडझिरे इंग्लिश मीडियम स्कूल, वडझिरे, ता.पारनेर, जि.अहिल्यानगर ३) गुरुदत्त इंग्लिश मीडियम स्कूल, शिरसगाव, ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर ४) बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल, गणेगाव, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर ५) स्व.उमाकांत मस्कुजी बुरुंगले इंग्लिश मेडियम स्कूल, शेगाव, जि. बुलढाणा ६) बाबूमिया शिराजुद्दीन पटेल विद्यालय, पिंपळगाव काळे, ता. जळगाव जामोद जि. बुलढाणा ७) सिराजुद्दीन बापूमिया पटेल गुरुजी विद्यालय, वडगाव गड, ता. जळगाव जामोद, जि. बुलढाणा ८) अनिशा ग्लोबल स्कूल, आष्टी, जि. बीड ९) हज्जन शकीलाबी अब्दुल वाहिद देशपांडे इंग्लिश मीडियम स्कूल, भुसावळ जि. जळगाव १०) ज्ञानगंगा हायस्कूल, जव्हार, जि. पालघर या शाळांचा समावेश आहे.
नीती आयोगाकडे या शाळांचे प्रस्ताव फेब्रुवारी- मार्च २०२५ मध्ये सादर करण्यात आले होते.
या शाळांना आता विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी व गणित या विषयांच्या अद्यावत प्रयोगशाळा उभारणीसाठी पहिल्या वर्षी रु. १२ लक्ष व त्यानंतर पुढील ४ वर्ष प्रत्येकी रु.२ लक्ष, असे एकूण २० लक्ष रुपयांचे अनुदान मिळणार आहे. शाळांनी बँक संदर्भातील आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर लवकरच रु.१२ लक्ष रुपयांचा अनुदानाचा पहिला हप्ता या शाळांकडे वर्ग करण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने यावर्षीच्या अर्थसंकल्पात देशात प्रतिवर्षी १०,००० "अटल टिंकरिंग लॅब" उभारण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्या अंतर्गत राज्यात आणि प्रामुख्याने अहिल्यानगर जिल्ह्यात जास्तीत जास्त "अटल टिंकरिंग लॅब" मिळवून देण्यासाठी विकासवर्धिनी प्रयत्न करणार आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ ( CBSE) किंवा राज्य शिक्षण मंडळाच्या मान्यता असलेल्या अनुदानित व विनाअनुदानित शाळांना या योजनेचा लाभ घेता येईल. इच्छुक संस्थांनी ९४२२२२२६९५ या क्रमांकावर संपर्क साधावा. मे २०२५ अखेर आणखी २५ संस्थांचे प्रस्ताव नीती आयोगाकडे सादर करण्यात येणार आहेत, अशी माहिती संस्थेची संचालक. विनायक देशमुख यांनी दिली.