संगमनेर संपत भोसले पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने ज्या प्रकारे तात्काळ आणि कठोर पावले उचलली,ती संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद आहे.असल्याचे मत संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी नुकतेच व्यक्त केले.
पुढे बोलताना आ.खताळ म्हणाले की'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारतीय सैन्याने अतिशय नियोजनपूर्वक आणि धाडसाने कारवाई करत दहशतवाद्यांचे ९ अड्डे उध्वस्त केले आहेत. ही केवळ प्रतिशोधात्मक कारवाई नव्हे,तर भारताच्या सार्वभौमत्वावरील कुठल्याही आघाताला दिलेले निर्णायक उत्तर आहे.
देशाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र सज्ज असलेल्या आपल्या जवानांचे मनःपूर्वक अभिनंदन करावे तितके थोडेच आहे. त्यांच्या धाडसामुळे आज देशवासीय अधिक सुरक्षित आहेत.या पराक्रमी यशामागे असलेली त्यांची कर्तव्यनिष्ठा, संयम आणि निस्वार्थ राष्ट्रभक्ती खरंच प्रेरणादायी आहे.
याचप्रमाणे, या यशस्वी ऑपरेशनमागे देशाचेपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मजबूत आणि निर्णायक नेतृत्व ही एक महत्त्वपूर्ण बाब ठरली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सुरक्षा यंत्रणांनी गेल्या काही वर्षांत जी सशक्तता प्राप्त केली आहे, त्याचे हे एक ठळक उदाहरण आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रश्नावर कोणतीही तडजोड न करता, कठोर निर्णय घेण्याची तयारी आणि दहशतवाद्यांवर पूर्ण नियंत्रण ठेवण्याची सरकारची भूमिका स्पष्ट दिसून येते.असेही यावेळी आमदार अमोल खताळ म्हणाले
या ऑपरेशनमुळे दहशतवाद्यांना आणि त्यांना आश्रय देणाऱ्या शक्तींना स्पष्ट संदेश मिळाला आहे.भारताच्या सीमा,जनता आणि जवानांवर हल्ला करणाऱ्यांना कठोर आणि त्वरित प्रत्युत्तर दिले जाईल.
आमदार अमोल खताळ, यांनी या धाडसी आणि प्रेरणादायी कामगिरीसाठी भारतीय सैन्याचे व. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मन:पूर्वक आभार व्यक्त करून त्यांचे अभिनंदन केले आहे.
