उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महापालिका आयुक्त सौरभ राव यांची केली कर्मचाऱ्यांनी कृतज्ञता व्यक्त
ठाणे विशाल सावंत-ठाणे महानगरपालिका ही नागरिकांना सेवा देणारी स्थानिक स्वराज्य संस्था असून या मार्फत नागरिकांना मिळणाऱ्या सेवा या अधिक जलद मिळण्याकरिता व कामकाजात सुसूत्रता यावी यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापने वरील अधिकारी कर्मचारी यांच्या पदोन्नतीकरिता विशेष प्रयत्न करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्यानुसार महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी महापालिकेतील अधिकारी कर्मचारी यांना पदोन्नती देण्याच्या सूचना संबंधित विभागाला नुकत्याच दिल्या होत्या.
त्यानुसार वरिष्ठ लिपिक या पदावर ४६ अग्निशमन प्रणेता (लिडिंग फायरमन) या पदावर १९ जणांना तर सहायक अग्निशमन केंद्र अधिकारी या पदावर २जणांना पदोन्नती देण्यात आली असून प्रशासनाच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
मागील काही वर्षाच्या कालावधीमध्ये शासनाकडून प्राप्त होणारे शासन निर्णय व न्यायालयाच्या आदेशाची पूर्तता करुन कार्यवाही करावयाची असल्यामुळे या पदोन्नती करण्यास विलंब होत होता.मात्र काही पदोन्नत्यांबाबत शासनाकडून सुस्पष्ट आदेश प्राप्त होताच महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अधिकारी कर्मचारी यांच्या पदोन्नत्या करणेबाबत विशेष ड्राईव्ह घेण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले होते. त्यानुसार आज महापालिकेने निर्गमित केलेल्या आदेशामुळे पदोन्नत्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.
मागील आठ ते दहा वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक अधिकारी- कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यामुळे अनेक पदे रिक्त होती. महापालिकेच्या कामाची व्याप्ती मोठ्या प्रमाणावर असून रिक्त पदांवरील पदोन्नती तातडीने होऊन कामकाज प्रभावीपणे व्हावे व कर्मचाऱ्यांचे देखील मनोबल वाढावे यासाठी आवश्यक ती कार्यवाही करणेबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनास सूचना केली होती. त्यानुसार आज विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांना अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे यांनी पदोन्नतीचे आदेश दिले असून लवकरच त्यांची पदस्थापना करण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. तर आगामी काळामध्ये उर्वरित रिक्त पदांवर देखील पदोन्नतीबाबत निर्णय घेवून तसे आदेश पारित करणार असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.
आज पारित करण्यात आलेल्या पदोन्नतीमध्ये वरिष्ठ लिपिक या पदावर ४६,अग्निशमन प्रणेता (लिडिंग फायरमन) या पदावर १९ जणांना तर सहायक अग्निशमन केंद्र अधिकारी या पदावर२ जणांना पदोन्नती देण्यात आली.या पदोन्नतीमुळे महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून सर्व कर्मचाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महापालिका आयुक्त सौरभ राव व प्रशासनाचे आभार व्यक्त केले.