किराणा मालाची ऑर्डर न देता डिलिव्हरी बॉयकडून महिलेचा विश्वासघात
नाशिक दिनकर गायकवाड ॲमेझॉन कंपनीकडे किराणा माल व घरगुती वस्तूंच्या ऑनलाईन ऑर्डर्स टाकण्यास सांगून त्या वस्तू न देता महिलेचा विश्वासघात केल्याप्रकरणी एका डिलिव्हरी बॉयविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी भाग्यश्री अनिल मुसळे ऊर्फ भाग्यश्री केतन बधान (रा. राजपाल कॉलनी, मखमलाबाद नाका, नाशिक) या मार्केट यार्डजवळील लॉजिस्टिक हब एजन्सीमध्ये कामास असताना ग्राहकांच्या ऑर्डर्स त्यांच्याकडे पाठवून पुन्हा त्यांना पैसे परत पाठविले व त्यांना फोन करून स्वतःचा क्यूआर कोड, बैंक अकाऊंट नंबर देऊन त्यावर ग्राहकांकडून पैसे घेतले, तसेच आरोपी अभिजित भिसे (रा. अमृतधाम, पंचवटी) याने, तसेच त्यांचे मित्र व त्याच्या ओळखीच्या व्यक्तींना ॲमेझॉन कंपनीकडे किराणा माल व घरगुती वस्तूंच्या ऑनलाईन ऑर्डर्स टाकण्यास सांगितले.
त्यांना या ऑर्डरच्या बदल्यात जास्त वस्तू पाठविल्या व पुन्हा त्यांना त्यांच्याच ऑर्डर्सचा रिफंडसुद्धा पाठवून फिर्यादीचा विश्वासघात केला, तसेच स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आरोपी अभिजित भिसे याने फसवणूक करून ३ लाख २७ हजार रुपयांचा अपहार केला. याबाबत त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने फिर्यादीला जिवे मारण्याची धमकी देऊन शिवीगाळ केली, तसेच काम सोडून निघून गेला. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अभिजित भिसे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.