नाशिक दिनकर गायकवाड वालदेवी नदीपात्रात दूषित पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात मासे मृत्युमुखी पडले असून, परिसरात दुर्गंधी पसरली आहे. येथील केटीवेअर बंधाऱ्या लगत नदीकाठावर मृत माशांचा खच पडलेला असून, खतप्रकल्पातून निघणारे दूषित पाणी नदीमध्ये मिसळल्याने हे संकट ओढवले आहे. लहान माशांपासून ते मोठ्या प्रजातींच्या मासांचा यात समावेश आहे.
गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे वाडीचे रान परिसरातील नाल्यांमधून खत प्रकल्पातील सांडपाणी थेट वालदेवी नदीपात्रात मिसळत आहे. परिणामी पाण्यातील ऑक्सिजनचा स्तर मोठ्या प्रमाणावर घटल्याने लाखो मासे तडफडून मृत्युमुखी पडत आहेत. या दूषित पाण्यामुळे नदीच्या पाण्याला दुर्गंधी सुटली असून, परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे देवळाली विधानसभा अध्यक्ष सोमनाथ बोराडे यांनी घटनास्थळी भेट दिली आणि प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली, तसेच परिसरातील शेतकरी व नागरिकांनी देखील याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्वरित पाहणी करून संबंधित प्रकल्पावर कारवाई करावी, अशी मागणी भगवान जाचक, संतोष जाचक, पांकुरंग डोंगरे, राजू जाचक, खंडू धोंगडे, नामदेव चव्हाण व अंबादास जाचक यांनी करीत तातडीने उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
