आश्वी संजय गायकवाड-अहमदाबादला विमान दुर्घटना झाली आणि आश्वीकारांचा थरकाप उडाला कारण संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील यश जयंतीलाल भंडारी हा युवक अहमदाबादला त्याच विमानतळावर होता आणि त्याने काही क्षणापुर्वी विमान प्रवासाचा फोटो प्रकाशित केला होता परंतु चौकशी अंती तो सुखरूप असल्याचे समजताच आश्वीकरांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
यश जयंतीलाल भंडारी यांने गुरुवारी समाज माध्यमात मुंबई ते अहमदाबाद दरम्यान विमान प्रवास करत असल्याची पोस्ट प्रकाशित केली त्यात दुपारनंतर अहमदाबाद येथे विमान दुर्घटना झाल्याची माहिती प्रसार माध्यमासह समाज माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाल्यामुळे यशच्या आई - वडीलांसह नातेवाईक आणि मित्र परिवाराच्या काळजाचा थरकाप उडाला.त्यामुळे त्यांची चौकशी करण्यासाठी सर्वानी यशच्या घराकडे धाव घेतल्यानंतर तो सुखरुप असल्याची माहिती मिळाली आणि सर्वाचा जीव भांड्यात पडला.
येथील जयंतीलाल मुळचंद भंडारी यांची कन्या सेजल भंडारी या मुंबई येथील राष्ट्रीयकृत बँकेत व्यवस्थापक पदावर कार्यरत होत्या.नुकतीचं त्यांची गुजरात राज्यातील अहमदाबाद कार्यालयात बदली झाली. त्यामुळे यश भंडारी हा आपली बहीण सेजल यांना विमानाने अहमदाबाद येथे सोडण्यासाठी गेला होता.
यावेळी यशने गुरुवारी मुंबई विमानतळावरून विमानाने अहमदाबादकडे प्रवास करत असल्याचे स्वःताचे छायाचित्र समाज माध्यमात पोस्ट केले होते.नंतर तेथे, दुपारी मोठी विमान दुर्घटना झाल्याची बातमी येऊन धडकली.त्यामुळे यशच्या आई - वडीलांसह नातेवाईक आणि मित्र परिवाराची भीतीने गाळण झाली.प्रत्येकजण यशला फोन लावत होता.
तिकडे यशचे विमान अहमदाबाद विमान तळावर उतरल्यानंतर तो बहीण सेजलसह तिच्या राहाण्याच्या ठिकाणी पोहचल्यानंतर अहमदाबाद - लंडन विमान अपघाताची बातमी त्याला समजली आणि त्यांच्या काळजात धस्स झालं.थोडावेळ त्याला काय झालं हे समजलंचं नाही.त्यानंतर त्याने जेव्हा मोबाईल हातात घेतला त्यावेळी त्यावर शेकडो मिस्ड कॉल आणि मॅसेज आलेले होते.
यानंतर यशने स्वतःला सावरत आपण सुखरूप असल्याची माहिती आई - वडीलासह नातेवाईक आणि मित्र परिवाराला कळवली,अन् त्यानंतर सर्वाचा जीव भांड्यात पडला.दरम्यान अहमदाबाद - लंडन विमान अपघातात २५० पेक्षा जास्त नागरीकांना जीव गमवावा लागल्यामुळे आश्वी परिसरात शोकाकुल वातावरण पहावयास मिळाले.
