श्रीरामपूरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्थलांतर हे हिंदू समाजाच्या अस्मितेवर आघात-प्रकाश चित्ते

Cityline Media
0
श्रीरामपूर प्रशासनाकडे स्पष्ट उत्तराची मागणी

श्रीरामपूर दिपक कदम शहरातील मध्यवर्ती श्री शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे स्थलांतर हे हिंदू समाजाच्या अस्मितेवर आघात असल्याची तीव्र प्रतिक्रिया हिंदू रक्षा कृती समितीचे निमंत्रक प्रकाश चित्ते यांनी व्यक्त केली आहे. सद्यस्थितीत श्रीरामपूरमध्ये पुतळा स्थापन करण्यासाठी आधी श्री शिवाजी चौकात भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र कुठलीही पूर्वसूचना किंवा खुलासा न देता अचानक नव्याने भाजी मंडई परिसरात भूमिपूजन होऊन तिथेच पुतळा बसवण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. या घडामोडींमुळे संपूर्ण श्रीरामपूर तालुक्यातील हिंदू समाजात संतापाची भावना आहे.
श्री चित्ते म्हणाले की, "हा विषय केवळ एका पुतळ्याचा नसून, तो श्रीरामपूरच्या हिंदूंच्या अस्मितेचा प्रश्न आहे.श्री शिवाजी महाराजांचा पुतळा पूर्वी ज्या ठिकाणी उभारण्यात येणार होता, तिच जागा योग्य होती. ती चौकाची जागा स्वाभाविकरीत्या 'श्री शिवाजी चौक' म्हणून ओळखली जाते. ती एक नैसर्गिक मागणी होती. आम्ही लहानपणापासून ही मागणी ऐकत आलो. परंतु अचानकपणे स्थलांतराचे निर्णय घेऊन हिंदूंच्या भावनांशी खेळ केला जातोय." हिंदू रक्षा कृती समितीच्या म्हणण्यानुसार, श्रीरामपूर मधील काही मुस्लिम संघटनांनी या पुतळ्याच्या मूळ जागेला विरोध दर्शवला होता. त्यानंतर प्रशासनाने कोणताही सार्वजनिक वाद न घडवता आणि स्पष्टीकरण न देता पुतळ्याचे काम भाजी मंडई परिसरात सुरू केले. "हा निर्णय म्हणजे मुस्लिमांच्या विरोधाचा विजय आणि हिंदू अस्मितेचा पराभव आहे," असेही प्रकाश चित्ते म्हणाले.

नामदार राधाकृष्ण विखे पा. यांच्या भूमिकेवर देखील या पत्रकात प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. "श्री शिवाजी महाराज चौकात पुतळा नको, याचे उत्तर त्यांनी द्यावे. जर भाजी  मंडईतच पुतळा बसवायचा होता, तर पूर्वी हिंदूंची दिशाभूल करत भूमिपूजन का करण्यात आले?" असा थेट सवाल चित्ते यांनी उपस्थित केला आहे. या घटनेबाबत राज्यात भाजपप्रणीत हिंदुत्ववादी सरकार असतानाही असे निर्णय होत आहेत, याबाबतही त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. "राम मंदिराचा संघर्ष, ३७० कलमाची समाप्ती, सीएए कायदा, अफजलखानाच्या कबरीचा निषेध हे सगळे निर्णय देशभरात होत असताना श्रीरामपूरमध्ये मात्र हिंदूंच्या भावना पायदळी तुडवल्या जात आहेत," असे ते म्हणाले. श्रीरामपूर तालुक्यातील हिंदू समाजाला आवाज न उठवता गप्प बसण्यास भाग पाडले जात आहे, असा आरोपही प्रकाश चित्ते यांनी केला आहे. "हिंदूंनी आवाज उठवू नये, त्यांच्या भावना महत्त्वाच्या नाहीत, असा प्रकार राबवला जात आहे. विरोध करणाऱ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न होतोय. श्रीरामपूरमध्ये लोकशाही नाही, गुलामगिरीचा अनुभव हिंदू समाजाला येतो आहे," असे त्यांनी पत्रकात म्हटले आहे.

या प्रकरणामुळे शहरात सामाजिक तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्थानिक प्रशासनाने पुतळ्याच्या स्थलांतराबाबत खुला संवाद आणि विश्वासार्ह निर्णय प्रक्रिया न राबवल्यास हा विषय अधिकच चिघळण्याची शक्यता आहे. शहरातील काही हिंदू संघटनांनी याप्रकरणी आंदोलना इशारा दिला असून, लवकरच निवेदन देऊन आंदोलनाची दिशा जाहीर केली जाईल, असेही सांगण्यात आले. या विषयावर अद्याप कोणत्याही प्रशासनिक अधिकाऱ्यांनी अधिकृत वक्तव्य दिलेले नाही. नगरपरिषद किंवा जिल्हा प्रशासनाकडून पुतळा स्थलांतराच्या मागील निर्णय प्रक्रियेबाबत माहिती दिली गेलेली नाही. तसेच नामदार विखे पा. किंवा अन्य स्थानिक लोकप्रतिनिधींची प्रतिक्रिया मिळालेली नाही.

दरम्यान, काही स्थानिक नागरिकांनी हे प्रकरण राजकीय हेतूंनी चिथावणीखोर पद्धतीने मांडले जात असल्याचा आरोप केला आहे. "शिवाजी महाराज हे संपूर्ण समाजासाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांच पुतळा कुठेही असो, त्यांचे स्मरण आणि विचार

 विचार महत्वाचे आहेत.मात्र त्यांचा वापर धार्मिक ध्रुवीकरणासाठी होऊ नये,” असे मत व्यक्त करणारेही काही नागरिक पुढे आले आहेत. शिवाजी महाराजांचा पुतळा हा केवळ एक शिल्प नसून तो जनतेच्या भावना, संस्कृती, आणि अस्मितेचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे त्याच्या स्थलांतरासंबंधी कोणताही निर्णय हा पारदर्शकतेने आणि सर्व पक्षीय सामाजिक सल्लामसलतीनंतरच घेणे अत्यावश्यक आहे. अन्यथा अशा निर्णयांचा विपरीत परिणाम केवळ सांस्कृतिक स्तरावरच नाही, तर सामाजिक शांततेवरही होऊ शकतो. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या गंभीर विषयाची दखल घेऊन स्पष्टता आणणे ही काळाची गरज आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!