नाशिक दिनकर गायकवाड -येथील राहत्या घराच्या दरवाजाचा कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने घरातील सोन्याचांदीचे दागिने, तसेच रोकड असा सुमारे पावणेचार लाख रुपयांचा ऐवज घरफोडी करून चोरून नेल्याची घटना पंचवटीत घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी अविनाश प्रकाश थोरात (रा. निर्मलनगर, मानेनगर, म्हसरूळ) यांच्या राहत्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा अज्ञात चोरट्याने कशाच्या तरी सहाय्याने तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाटात
असलेल्या १ लाख ५० हजार रुपये किमतीच्या दीड तोळ्याच्या सोन्याच्या तीन अंगठ्या, पाच हजार रुपये किमतीची पाच ग्रॅम वजनाची कानातील रिंग, पाच हजार रुपये किमतीचे तीन ग्रॅम वजनाचे कानातील टॉप्स, साडेचार हजारांची तीन ग्रॅमची कानातील बहाणी, २५ हजार रुपयांची तीन ग्रॅम वजनाची सोन्याची ठुशी, १५ हजार
रुपये किमतीची दीड तोळ्यांची सोन्याची पोत, हजार रुपयांचे सोन्याचे मणी, पाच हजारांचे पाच ग्रॅमचे डोरले, ८ हजार रुपयांचे ८ ग्रॅमचे सोन्याचे डोरले, हजार रुपयांचे एक ग्रॅमचे सोन्याचे धम्मचक्र, दोन हजारांच्या दोन ग्रॅम वजनाच्या बाळ्या, एक हजाराची सोन्याची नथ, नऊ
हजार रुपयांचे चांदीचे ब्रेसलेट, सहा हजारांची चांदीची अंगठी, पाच हजारांचे चांदीचे कडे, तीस हजार रुपये किमतीचे चांदीचे शिक्के, ३५ हजार रुपये किमतीचे चांदीचे बिस्कीट, १५०० रुपये किमतीचा चांदीचा छल्ला व लग्नात आहेर म्हणून आलेली ५५ हजारांची रोकड असा एकूण ३ लाख ७३ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने घरफोडी करून भरदुपारी चोरून नेला. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री.पटारे करीत आहेत.
