मिळकत खरेदी करून देण्याच्या बहाण्याने झाली फसवणूक
नाशिक दिनकर गायकवाड मिळकत खरेदी करून
देण्याच्या बहाण्याने येथे एका इसमाची २५ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोन महिलांसह एका पुरुषाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,की आरोपी सोनाली साहेबराव पवार (वय ३६, रा. अशोकनगर, सातपूर) हिने नाशिक तालुक्यातील मौजे गोवर्धन वेथील गट नंबर ४८/१/४/२ यातील फिर्यादी जितेंद्र भास्कर शिंदे (रा. मु. पो. ता. साक्री, ह. मु. बालेवाडी, पुणे)
यांच्या मिळकती शेजारी आरोपी विद्युल्लता राजेंद्रकुमार पाटणकर (रा. आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक) यांची खाते क्रमांक ५८२ मधील मिळकत फिर्यादींना खरेदी करून देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर आरोपींनी संगनमत करून फिर्यादी जितेंद्र शिंदे यांना फसविण्याच्या इराद्याने दि. ९ मे २०२४ चा बनावट दस्त दाखविला.शिंदे यांचा विश्वास संपादन
करून व्यवहार पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडून २५ लाख रुपये घेतले; मात्र प्रत्यक्षात नमूद मिळकत आरोपी पाटणकर यांनी फियांदीची हरकत असतानाही तिसऱ्याच व्यक्तीला परस्पर विक्री करून फिर्यादी शिंदे यांची फसवणूक केली आहे. हा प्रकार ऑगस्ट २०२४ ते दि. ८ जून २०२५ या कालावधीत ठक्कर बझार सीबीएस येथे पडला.
या प्रकरणी सोनाली पवार, गणेश शंकर अत्रे, विद्युल्लता पाटणकर यांच्याविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार डगळे करीत आहेत.
