दागिने लुबाडणाऱ्या टोळीकडून ६० वर्षीय महिलेची फसवणूक
नाशिक दिनकर गायकवाड- येथील पंचवटी कारंजा परिसरातील इंदिरा गांधी दवाखान्याजवळ एका ६० वर्षी महिलेची दोन अनोळखी इसमांनी फसवणूक करून सोन्याचे दागिने लुबाडल्याची घटना घडल्याने परिसरात नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.
सविस्तर वृत्त असे की फिर्यादी सुमन यशवंत कर्डक (वय ६०, रा. नागसेननगर, वडाळा नाका, द्वारका, नाशिक) या महिला इंदिरा गांधी दवाखान्याजवळ आल्या असता दोघेही त्यांच्याजवळ आले. त्यांनी पुढे भांडणे सुरू असल्याचे सांगत, तुमचे कानातले दागिने काढा, असा सल्ला दिला.कर्डक यांनी कानातील सुमारे १ तोळा
वजनाचे सोन्याचे वेल आणि कर्णफुले काढून पिशवीत ठेवली. त्यानंतर त्या इसमांपैकी एकाने पिशवी मी बांधता,असे सांगून हातचलाखीने दागिने लंपास केले आणि रिकामी पिशवी महिलेच्या हातात दिली.
या प्रकारात कर्डक यांची अंदाजे ४० हजार रुपयांची फसवणूक झाली असून, याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील व विलास पडोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.सोर करीत आहेत.
