-पहिल्यादा गरोदर राहिल्यानंतर मुस्लिम धर्म स्वीकारण्याची जबरदस्ती,पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
नाशिक दिनकर गायकवाड आईवडिलांची प्रॉपर्टी नावावर करण्याचा तगादा लावून विवाहितेसह तिच्या दोन मुलांचा धर्मातरासाठी शारीरिक व मानसिक छळ करून त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पतीसह सासरच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,की फिर्यादीला मुस्लिम बनविण्याच्या हेतूने तिचा विश्वास संपादन करण्यासाठी सुरुवातीला चांगली वागणूक दिल्याचे भासवून तिच्याशी लग्न केले.त्यानंतर संशयित पती व तिच्या सासरच्या सहा जणांनी विवाहितेच्या वडिलांकडून सहा लाख रुपये घेतले.
पहिल्यांदा गरोदर राहिल्यावर त्यांना मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी आरोपींनी जबरदस्ती करून त्यांच्यावर अत्याचार केले. प्रसूतीनंतर विवाहितेने मुलीचे हिंदू नाव ठेवले,तसेच धर्मातरास प्रतिसाद न दिल्याने तिच्या पतीने सारडा सर्कल येथे तिचा रस्ता अडवून धारदार शस्त्र दाखवून आईवडिलांची प्रॉपर्टी नावावर करून देण्याची व धर्मांतर केले नाही,तर जिवंत ठेवणार नाही आणि ठार मारुन टाकीन अशी धमकी दिली.त्यानंतरही विवाहितेने धर्मपरिवर्तनास नकार दिला.
याचा राग आल्याने पतीने विवाहितेस दुसऱ्या वेळी गरोदर अवस्थेत असताना मारहाण करून जमिनीवर पाडले व गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न केला, तसेच देवदेवतांचा अवमान करून घरातील फोटो बाहेर फेकले, तसेच वेळोवेळी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिच्या दोन्ही मुलांना जिवे ठार मारण्याची धमकी देऊन विवाहितेकडील दागिने व पैसे जबरदस्तीने हिसकावून घेतले. हा प्रकार सन २०१९ ते दि. ३ जून २०२५ या कालावधीत सदाशिवनगर, रेणुकानगर, वडाळा नाका व सारडा सर्कल परिसरात पडला. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
