-मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांची ग्वाही
-आश्वी येथे विखे पाटील कारखान्याच्या नुतन संचालकाचा सत्कार सोहळा उत्साहात
आश्वी संजय गायकवाड आपल्या शेजारील कारखाना निवडणूक प्रक्रिये दरम्यान दोनशे अर्ज, ्नाराजी नाटय, संन्यास घेण्याची भाषा ऐकायला मिळाली. मात्र, पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील, दिवंगत. बाळासाहेब विखे पाटील आणि नामदार राधाकृष्ण विखे पा. यांनी आपल्या कारखान्याच्या सभासदांचा विश्वास संपादन केल्यामुळे तिसऱ्यांदा कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली. या निवडणुकीत २१ जागांसाठी एकवीसचं अर्ज आले. त्यामुळे सभासदांनी दाखवलेल्या मनाच्या मोठेपणामुळे आपल्या कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली. तर, २०२९ ला विधानसभेसाठी मतदान मागण्यापूर्वी निळवंडे कालव्याच्या पाण्यापासून मतदार संघातील एक स्क्वेअर फूट जागा देखील आपण वंचित ठेवणार नाही. अशी ग्वाही पद्मश्री डॉ. विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.
छाया-परेश कापसे
संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे डॉ. विखे पाटील कारखान्याच्या नुतन संचालकांच्या आयोजित सत्कार सोहळ्यात डॉ. विखे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते अॅड. शाळीग्राम होडगर होते. कारखान्याचे माजी अध्यक्ष कैलास तांबे, ज्येष्ठ नेते भगवान इलग, अशोक म्हसे, सरुनाथ उंबरकर, अॅड. रोहीणी निघुते, ॲड.अनिल भोसले बापुसाहेब गायकवाड मकरंद गुणे डॉ.दिनकर गायकवाड प्रा. कान्हु गिते ,सतिष जोशी जेहुर शेख अशोक जऱ्हाड यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी आणि पंचक्रोशीतून आलेले कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी कारखान्याच्या सर्व नवनिर्वाचित संचालकाचा सत्कार करण्यात आला.
सभासदांनी दाखवलेल्या मनाच्या मोठेपणामुळे निवडणूक बिनविरोध झाल्याचे सांगताना डॉ. विखे पुढे म्हणाले की, सहकारी कारखान्याचे संचालक पद हे लाभाचे पद नसून कार्यकर्त्यानी पिढ्यानपिढ्या केलेल्या कामाची आणि दाखवलेल्या विश्वासाची पावती आहे. तर, संघटनेच्या हितासाठी तब्बल १८ वेळा विविध निवडणूका मधून माघार घेणाऱ्या कार्यकर्त्याचे विशेष कौतुक करताना यावेळी त्यांना संधी दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
राजकीय टिप्पणी करताना ते म्हणाले की, गणेश कारखान्याचा आणि लोकसभेचा पराभव झाल्यानंतर ही शिर्डी विधानसभा मतदारसंघातील जनतेने मोठे मताधिक्य देऊन ना. विखे पाटील यांना विधानसभेत पाठवले. मात्र, शेजारी कामगाराच्यां माध्यमातून आपल्या मतदारसंघातील माहिती गोळा करत होते. त्यामुळे बेसावध असलेल्या शत्रुच्या घरात घुसुन पराभूत करणे सोपे झाले. असा टोला माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता लगावताना, निवडणूक संपली आहे. त्यामुळे आमच्या मनात आता कोणतीही द्वेष भावना नसून आमची लढाई ही कोणत्याही व्यक्तीशी नव्हे तर क्रुद्ध विचारांशी होती.असे स्पष्ट करुन भोजापूर चारीचे आणि साकुर उपसा योजनेचे भूमिपूजन करणार नाही, तोपर्यत संगमनेर तालुक्यात सत्कार स्विकारणार नसल्याचा पुनरुच्चार डॉ. विखे यांनी केला.
कार्यकर्त्याचे कान टोचताना ते म्हणाले की, खुर्चीचा मोह आता सोडा, शेवटी माणूस लाकडावरचं झोपून जातो असे म्हणताच उपस्थितांमध्ये एकचं हशा झाला. संघटनेत काम करताना एकनिष्ठ कार्यकर्त्याला काही मागण्याची गरज पडणार नाही. त्याला योग्य वेळी मान सन्मान आणि पद देण्याची ग्वाही दिली. तसेच गावागावांतील कार्यकर्त्यानी अबोला आणि मतभेद न ठेवता एकमेकांशी संवाद ठेवावा आणि एकदिलाने काम करावे. असे आवाहन करताना अंबानी बंधूंच्या उदाहरणासह पटवून दिले.
दरम्यान खळी, पिंप्री - लोकई अजमपुर, अंभोरे, पिपंरणे आणि घारगाव या भागाला लवकरचं पाईप टाकून निळवंडे कालव्यांचे पाणी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती त्यांनी दिली.तर, लवकरचं दुध उत्पादक शेतकऱ्यांना निम्या किंमतीत पशुखाद्य उपलब्ध करुन देणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला आहे.
डॉ.सुजय विखेंनी पायी प्रवासात साधला जनतेशी संवाद
-संगमनेर जनसेवा कार्यालयाचे प्रमुख व आश्वी खुर्द येथील सुजित क्षिरसागर यांच्या आजीचे नुकतेच निधन झाले होते तेथे डॉ.सुजय विखे पा. यांनी भेट दिली व तेथुनच डॉ.सुजय विखे पाटील हे पायी आश्वी बुद्रुक येथील आठवडे बाजार व सभेच्या ठिकाणी सुमारे दिड कि.मी.चे अंतर पायी चालत आले मात्र त्यांच्या बरोबरची कार्यकर्ते घामाघुम झाले काही मागे राहीले तर काही गाड्यांवर आले मात्र सुजय विखे थकले नाही या प्रवासा दरम्यान अनेक ग्रामस्थ महिला जेष्ठ नागरिक यांनी सुजय विखे यांच्याशी संवाद साधला तसेच प्रवरा बँकेचे मा.अध्यक्ष अशोक म्हसे वय ७२ हे न थकता चालले त्यांचे कौतुक करत यातुनच कार्यकर्त्यांची पारख होत असते अशा कानपिचक्या युवा कार्यकर्त्यांना दिल्याने सर्वत्र समाधान दिसत होते.