नाशिक दिनकर गायकवाड गोदावरी नदीच्या वाहत्या पाण्यात आंघोळ करण्यासाठी उतरलेल्या राजस्थान तसेच वडाळा येथील दोघे अल्पवयीन मुले वाहून गेली.या दोघांनाही रामकुंड येथील जीवरक्षक तसेच मनपाच्या सुरक्षा दलाच्या जवानांनी काही स्थानिक नागरिकांच्या मदतीने पाण्यातून सुखरूप बाहेर काढून त्यांचा जीव वाचवला.
चार दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झालेली आहे. त्यातच धरणातून पाण्याचा विसर्ग केल्याने गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. काल दुपारी राजस्थान येथील एक अल्पवयीन मुलगा निलकंठेश्वर मंदिर जवळ नदीपात्रात आंघोळ करण्यासाठी उतरला. मात्र त्याला त्या वाहत्या पाण्याचा अंदाज न आल्याने तो
वाहून जाऊ लागला.
हा प्रसंग गंगाघाटावर कार्यरत असलेल्या जीवरक्षक गणेश उईके,अजित सडमाके,दादू उईके,अण्णा सोनवणे यांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ पाण्यात उडी मारून त्या अल्पवयीन मुलाला पाण्यातून बाहेर काढून कुटुंबियांच्या स्वाधीन केले. या घटनेला काही तास लोटत नाही तोच सायंकाळी साडेपाच वाजता वडाळा गावातील अमन खान हा अल्पवयीन मुलगा दुतोंड्या मारुती समोरच्या नदीपात्रात वाहून जात असल्याचे गंगाघाटावर कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षक सचिन राऊत, योगेश घोडके, भास्कर बेनके, नामदेव बेनके, शितल, पगारे, महाले यांच्या निदर्शनास आले त्यांनी तत्काळ स्थानिक नागरिकांना मदतीसाठी बोलावून पाण्यात वाहून जाताना या मुलाला वाचवले.