पुणे सिटीलाईन न्यूज नेटवर्क-श्री क्षेत्र देहू व श्री क्षेत्र आळंदी पालखी सोहळा-२०२५ पूर्वतयारी आढावा बैठक नुकतीच पुणे विधान भवन येथील विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडली.
आषाढी पालखी सोहळ्या दरम्यान वारकऱ्यांना कोणत्याही स्वरूपाचा त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी;पालखी तळ, मुक्कामाच्या ठिकाणी तसंच संपूर्ण पालखी मार्गावर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात,असे निर्देश बैठकीत दिले.
पावसाच्या पार्श्वभूमीवर विसाव्याच्या,मुक्कामाच्या ठिकाणी आवश्यक व्यवस्था करावी. दिवे घाटात पाऊस पडत असल्यास पालखी सोहळा जाण्यास अडचण येणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी.घाट परिसरात पालखीचे दृश्य पाहण्यासाठी नागरिकांना प्रतिबंध करावा. डोंगराच्या बाजूनं खोदाई सुरू असल्यानं पावसानं दगड रस्त्यावर येऊन वारकऱ्यांना धोका उत्पन्न होऊ नये म्हणून बॅरिकेटिंग करावं, असं बैठकीत सूचित केलं.
उंडवडी कडेपठार येथील बारामतीकडे जाणाऱ्या जुन्या तुकाराम महाराज पालखी मार्गावरील राडारोडा दूर करावा, रस्त्यावरील खड्डे भरून घ्यावेत, काम वेगानं पूर्ण करावं. इंदापूरकडे जाणाऱ्या पालखी महामार्गाच्या कामाला वेग द्यावा. इंदापूर ते पंढरपूर दरम्यान पालखी महामार्गाच्या कामाला गती मिळणं आवश्यक असून पालखी जाईपर्यंत सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना कराव्यात. पीएमआरडीएच्या मेट्रोच्या कामामुळे रस्त्याच्या बाजूला असलेलं बांधकाम साहित्य त्वरित बाजूला करावं.
महावितरणनं संपूर्ण पालखी मार्गावर आपल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पथक सतर्क आणि कार्यरत ठेवावेत. जिल्हा परिषद व नगरपालिकांनी पालखी सोहळा पुढे गेल्यावर त्वरित त्या मार्गाची,गावांची स्वच्छता करावी. मुक्कामाच्या ठिकाणी वीज व्यवस्थेसाठी संबंधित जिल्हा परिषद तर्फे जनरेटरची व्यवस्था करावी. आवश्यकता असल्यास जनरेटरसाठी जिल्हा नियोजन समितीतून अधिकचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असं बैठकीत स्पष्ट केलं.
वादळात रस्त्याच्या कडेला असलेले जाहिरात फलक खाली कोसळून दुर्घटना होऊ नये म्हणून अनधिकृत फलक तातडीनं काढावेत.त्यासाठी संपूर्ण मार्गावर महसूल,पोलीस अधिकारी व स्थानिक स्वराज्य संस्थांनी संयुक्त पाहणी करावी. अधिकृत जाहिरात फलकांचं संरचनात्मक स्थिरता परीक्षण (स्ट्रॅक्चरल स्टॅबिलीटी ऑडिट) करून घ्यावं, असे देखील निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
कोविडच्या साथीच्या पार्श्वभूमीवर पालखी सोहळा प्रमुख, दिंडी प्रमुखांशी संवाद साधून सर्दी, ताप, खोकला आदी त्रास असणाऱ्या वारकऱ्यांनी वारीत सहभागी होण्यापूर्वी तपासणी करुन घ्यावी,असं आवाहन करण्यात यावं.
असे आजार असलेल्या वारकऱ्यांची तपासणी, उपचार तातडीनं होतील यासाठी आवश्यक ती तपासणीची व्यवस्था,औषधं पालखी मार्गावरील आरोग्य पथकांकडे ठेवावीत, अशा सूचना दिल्या.
या बैठकी दरम्यान पुणे पोलीस वाहतूक शाखेतर्फे तयार करण्यात आलेल्या ‘पीटीपी ट्रॅफिकॉप’ मोबाईल ॲपच्या लोकार्पणाचा कार्यक्रम देखील पार पडला.पालखीच्या रिअल टाईम ट्रॅकिंगसाठी पालखी ट्रॅकिंग ॲपचं लोकार्पण करण्यात आलं. तसंच पुणे पोलीस आयुक्तालय मार्फत राबवण्यात येणाऱ्या ‘प्रोजेक्ट वारी’ या संगणकीय उपक्रमाचं सुद्धा लोकार्पण करण्यात आलं. या उपक्रमांतर्गत वारकऱ्यांची संख्या मोजण्यात येणार असल्यामुळे त्याचा भविष्यात अचूक नियोजनासाठी उपयोग होणार आहे.
