अन्याय धोरणांविरोधात ट्रॅक कॉम्पोनंट्स कामगारांचा एल्गार, उद्या मुख्यमंत्र्यांना भेटणार
नाशिक दिनकर गायकवाड सिडको येथील औद्योगिक वसाहतीमधील ट्रॅक कॉम्पोनंट्स या कंपनीकडून स्थानिक कामगारांवर होत असलेल्या अन्यायकारक व मनमानी कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रणित मार्शल संघटित-असंघटित कामगार युनियनने 'चड्डी मोर्चा' काढला असुन सोमवारी कामगार उपायुक्त कार्यालय येथून थेट मंत्रालय गाठण्यासाठी मोर्चा मुंबईकडे कूच झाला. दोन दिवसांत कामगारांनी ६४ किलोमीटर अंतर पार करत ते कसाऱ्यात दाखल झाले.
आंदोलनाचे नेतृत्व अध्यक्ष प्रशांत खरात करत आहेत.स्थानिक कामगारांची अवहेलना करून बाहेरून मजूर मागवणे, कामगारांवर मानसिक दबाव आणणे,कंत्राटी कामगारांना विनासूचना कमी करणे.तसेच युनियनशी संबंधित कामगारांवर वैयक्तिक कारवाई होणे अशा समस्या वाढल्याने आंदोलनाचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या आंदोलनात शहरातील विविध कामगार संघटना सहभागी झाल्या आहेत.मंगळवारी रात्री मोर्चा कसाऱ्यापर्यंत पोहोचला असून, बुधवारी शहापूरकडे तो कूच करणार आहे. या आंदोलनाची कंपनी प्रशासन तसेच जिल्हा प्रशासनाने दखल घेतली नसल्यामुळे कामगारांमध्ये संतापाचे वातावरण आहे. मोर्चा ५ जूनपर्यंत मंत्रालय येथे पोहोचणार असण्याची शक्यता निर्माण झाली आहे, मुंबईत मुख्यमंत्री अथवा उपमुख्यमंत्री यांना निवेदन देणार असल्याची माहिती श्री.खरात यांनी दिली.
