नाशिक दिनकर गायकवाड येथील सामाजिक कार्यकर्ते आणि नाशिकरोड वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी संस्थेचे सरचिटणीस गौतम सोनवणे यांना मानव कल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचा मानव कल्याण गौरव पुरस्कार माजी जिल्हाधिकारी बी.जी.वाघ, मा. न्यायाधीश अनिल वैद्य यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी करुणासागर पगारे, शिवदास म्हसदे, के. के. बच्छाव, मानव कल्याणचे अध्यक्ष टी. वाय.जाधव, उपाध्यक्ष डॉ. स्वप्नील देखणे, सचिव अरुण देदि यांची प्रमुख उपस्थिती होती. सामाजिक कार्य करणाऱ्या २९ व्यक्ती व ३ संस्थांना मानव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले.
गौतम सोनवणे यांनी महात्मा फुले जनआरोग्य योजनेची माहिती गरीब रुग्णांना देऊन सरकारी योजनेतून मोफत वैद्यकीय उपचार मिळवून देण्यास मदत केली.कर्करोग रुग्णांना मोफत वैद्यकीय उपचार मिळवून -दिले.बेघरांना मनपाच्या निवारा केंद्रात सोय करून दिली. वृत्तपत्र विक्रेता बांधवांचे प्रश्न सोडविण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न केले.
जनआरोग्य समितीच्या माध्यमातून आंदोलन करून खासगी रुग्णालयांना रुग्ण हक्क सनद, दर पत्रक लावण्यास भाग पाडले. खासगी रुग्णालयांबाबतच्या तक्रार निवारणासाठी कक्ष स्थापण्याकरीता यशस्वी पाठपुरावा केला. कोविड काळात पशुपक्षांसाठी अन्नधान्य, पाणपोईची सोय केली. या कार्याबद्दल सोनवणे यांना हा पुरस्कार देण्यात आला.
