पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्या इशाऱ्यामुळे अनेक जण सतर्क
कोल्हापूर,सिटीलाईन न्यूज नेटवर्क-गुन्हा दाखल झालेल्या संशयितांना पोलिस ठाण्यात आणल्यानंतर जामिनासाठी ठराविक वकिलांची नावे सुचविण्याचा प्रकार काही पोलिसांकडून सुरू आहे.याबाबतची तक्रार कोल्हापूर सिटी क्रिमिनल कोर्ट प्रक्टिशनर्स बार असोसिएशनने पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्याकडे केली होती.
अधीक्षकांनी याची दखल घेऊन असे प्रकार करणाऱ्या पोलिसांवर कारवाईचा इशारा दिला.याबाबतचा आदेश त्यांनी सर्वच पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना पाठवला आहे.
काही पोलिस कर्मचारी पोलिस ठाण्यातुन संशयित आरोपीना ठराविक वकिलांची नावे सुचवतात.कामे त्यांच्याकडेच देण्यासाठी सक्ती करतात, सर्व कामे काही वकिलांना मिळवून देण्यासाठी मदत करतात,असे निदर्शनास आले होते. या संदर्भात बार असोसिएशनने आक्षेप नोंदवून विशेष सर्वसाधारण सभेत ठराव केला होता. दैनंदिन न्यायालयीन कामकाजात पोलिसांकडून होणाऱ्या हस्तक्षेपा बाबत गंभीर चर्चा झाली आहे.
पोलिस अधीक्षक गुप्ता यांनी या तक्रारीची गांभीयनि दखल घेतली.विशिष्ट हेतूने केलेल्या कामातून पक्षपाती प्रवृत्ती समोर आली असून याद्वारे संपूर्ण पोलिस दलाला बदनामीला सामोरे जावे लागत आहे.अशा प्रकारचा हस्तक्षेप करणे, ही बाब पोलिस दलाच्या शिस्तीस व
नीतिमूल्यांना बाधा पोहोचविणारे काम असल्याने कोणत्याही परिस्थितीत संशयितांवर वकील निवडण्यासाठी कोणताही दबाव किंवा सक्ती केली जाऊ नये. असा प्रकार निदर्शनास आल्यास संबंधितांवर कठोर कार्यवाही केली जाईल, असेही पोलिस अधीक्षक गुप्ता यांनी सांगितले.
