अब्रूनुकसानीचा फौजदारी खटला दाखल होताच राजकीय प्रतिमा डागाळल्या
छत्रपती संभाजीनगर सिटीलाईन न्यूज नेटवर्क राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष मा. खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात फौजदारी अब्रूनुकसानीचा खटला दाखल केला आहे.या खटल्यावर २४ जून रोजी सुनावणी होणार आहे.
शिरसाट यांच्या वतीने ॲड, राजेश काळे यांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार, ५ जून रोजी पत्रकार परिषदेत इम्तियाज जलील यांनी शिरसाट यांनी पदाचा दुरुपयोग करून शेंद्रा एमआयडीसी येथील आरक्षित भूखंड आपल्या मुलाच्या नावे मिळवला असल्याचा आरोप केला होता. या आरोपामुळे जनतेमध्ये त्यांच्या प्रतिमेला धोका निर्माण झाल्याचा दावा त्यांनी न्यायालयात केला आहे.
शिरसाट यांचे म्हणणे आहे की, संबंधित भूखंड व्यवहाराशी त्यांचा काहीही संबंध नाही, त्यांनी कोणत्याही अधिकाऱ्याला फोन केला नाही किंवा कोणतीही शिफारस केली नाही. या आरोपांमुळे त्यांच्या सार्वजनिक प्रतिमेला ठेच बसली असून
त्यामुळे त्यांनी इम्तियाज जलील यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५६ (१), (२), (३) आणि जुना अन्नूनुकसानीचा कायदा कलम ५०० अंतर्गत फौजदारी खटला दाखल केला आहे.
या खटल्याची सुनावणी १९ जून रोजी नियोजित होती, मात्र न्यायालयातील नियमित न्यायाधीशांच्या अनुपस्थितीमुळे ती पुढे ढकलण्यात आली असून आता २४ जून रोजी सुनावणी होणार आहे. या प्रकरणात दोष सिद्ध झाल्यास जलील यांना दोन वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते, मात्र, शिरसाट यांनी या प्रकरणात कोणतीही नुकसान भरपाई मागितलेली नाही.
राजकीय स्तरावर सुरू असलेल्या या वादामुळे शहराच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली असून शिरसाट विरुद्ध जलील संघर्ष थांबण्याचे कोणतेही संकेत दिसत नाहीत.
