ठाणे महापालिकेची संपूर्ण घोडबंदर रस्त्यावर सर्वंकष स्वच्छता मोहीम

Cityline Media
0
-माजिवडा ते गायमुख या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजू आणि सेवा रस्त्यांची साफसफाई
-रस्त्याच्या चार विभागांसाठी स्वतंत्र अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर दिली जबाबदारी

           ठाणे विशाल सावंत- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेनुसार ठाणे महानगरपालिकेने ०३ आणि ०४ जून रोजी संपूर्ण घोडबंदर रस्त्यावर सर्वंकष स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. मुख्य रस्ता, सेवा रस्ता, दुभाजक, चौक अशा सर्व ठिकाणी ही मोहीम राबवण्यात येत आहे. मंगळवारी सकाळी या मोहिमेस सुरूवात झाली. बुधवारी सकाळीही मोहीम सुरू राहणार असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
चार भागात रस्त्याच्या सफाईचे नियोजन
महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार, माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत घोडबंदर रोडवर दुर्तफा सर्वंकष स्वच्छता मोहिमेचे नियोजन करण्यात आले. कापूरबावडी ते पातलीपाडा, पातलीपाडा ते हायपर सिटी, हायपर सिटी ते नागला बंदर, नागला बंदर ते गायमुख असे या रस्त्याचे चार विभाग करण्यात आले असून त्या प्रत्येक विभागासाठी समन्वयक अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. प्रत्येक विभागासाठी समन्वयक अधिकाऱ्यासोबत सहाय्यक आयुक्त, आरोग्य अधिकारी, कार्यकारी अभियंता, उप अभियंता, उपमुख्य स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, कनिष्ठ अभियंता आणि स्वच्छता कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

संपूर्ण घोडबंदर रोडच्या स्वच्छतेवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. या मोहिमेत, मुख्य रस्ता, सेवा रस्ता, दुभाजक या ठिकाणी कचरा काढणे, डेब्रिज उचलणे, दुभाजक स्वच्छ करणे, नाले आणि गटारातील गाळ उचलणे, रस्त्याची साइडपट्टी स्वच्छ करणे, झाडांच्या कापलेल्या फांद्या उचलणे आदी कामे करण्यात येत आहेत. मोठ्या प्रमाणावर अधिकारी आणि कर्मचारी त्यात सहभागी झाले असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिली.

           ५०० सफाई कामगारांचा सहभाग 
या मोहिमेत महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागासोबत, उद्यान विभाग,सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रभाग समिती, एमएमआरडीए, एमएसआरडीसी, मेट्रो यांनीही सहभाग घेतला आहे. सुमारे ५०० सफाई कामगार, १५ डम्पर, यांत्रिक सफाईच्या दोन्ही मशीन्स यांच्या मदतीने ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. उपायुक्त मनीष जोशी आणि दिनेश तायडे, उपनगर अभियंता विकास ढोले आणि सुधीर गायकवाड यांच्यावर समन्वयाची जबाबदारी असून आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त सोनल काळे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी त्यांना नेमून दिलेल्या विभागातील सर्वंकष स्वच्छता अभियानात सहभागी झाले आहेत.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!