नाशिक दिनकर गायकवाड येथील आदिवासी विकास महामंडळा तर्फे गेल्या खरीप हंगामात खरेदी करण्यात आलेल्या धानाचे मिलिंग करून चार लाख ६७ हजार ८६३ क्विंटल तांदूळ विविध जिल्ह्यांच्या पुरवठा विभागांना वितरित करण्यात आला असल्याची माहिती महामंडळाच्या अधिकृत सूत्रांकडून समजली आहे.
गेल्या खरीप हंगामात महामंडळाने २७ लाख २८ हजार ३२३.२५ क्विंटल धानाची खरेदी केली होती. त्यापैकी १५ लाख ३० हजार ६० क्विंटल धानावर प्रक्रिया करून त्यापासून तांदूळ तयार करण्यात आला. ८ लाख २७४६ क्विंटल तांदूळ तयार झाला. तयार झालेला तांदूळ जिल्हा पुरवठा विभागाला देण्यात येतो.
यावर्षी शेतकऱ्यांना २३०० रुपये प्रतिक्विंटल या दराने पैसे देण्यात आले. खरेदी केलेल्या धानापोटी शेतकऱ्यांना थेट त्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्यात आले. ६११ कोटींचे पेमेंट करूनही महामंडळाला १६ कोटींच्या निधीची प्रतीक्षा होती. यामुळे काही शेतकऱ्यांचे देणे बाकी होते. राज्य शासनाने नुकतेच महामंडळाकडे १६ कोटी रुपये वर्ग केले असल्याचे सूत्रांनी सांगितले. यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
