क्रांतिकारी खाज्जाची नाईक स्मारकाचे मुख्यमंत्र्याच्या हस्ते लोकार्पण

Cityline Media
0
- स्मारकस्थळी महिलांसाठी कौशल्य विकास केंद्र उभारणार

-धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’अंतर्गत आदिवासी समाजाच्या गावात १७ प्रकारच्या योजना राबविणार 
-  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

- गोद्री फत्तेपूर येथे गोर बंजारा आणि लबाना कुंभ स्मृतीस्थळी विविध विकास कामांचे ई-भूमिपूजन

जळगाव सिटीलाईन न्यूज नेटवर्क ‘धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’अंतर्गत राज्यातील आदिवासी गावांमध्ये १७ प्रकारच्या योजनांची अंमलबजावणी करून आदिवासी समाजाचा कायापालट केला जाणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
धरणगाव येथे उभारण्यात आलेल्या क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे उद्घाटन व जामनेर तालुक्यातील गोद्री फत्तेपूर येथे गोर बंजारा आणि लबाना कुंभ स्मृतीस्थळी पाच कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे ई-भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी धरणगाव येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.

कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे,आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण,पद्मश्री चैत्राम पवार, अनिल भालेराव, शरदराव ढोले, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आदी  उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मृतीस्मारक अत्यंत सुंदर झाले आहे. राणी दुर्गावती, भगवान बिरसा मुंडा, सिद्धू-कान्हू, तंट्या मामा, झलकारी बाई, राघोजी भांगरे, भिमा नाईक, रुमाल्या नाईक, राणा पुंजा भिल, यांच्यासारख्या अनेक नायकांचे दर्शन या स्मारकात घडते. हे स्मारक केवळ ऐतिहासिक नाही, तर येथे आश्रमशाळा असून अस्मिता जागवण्याचे कार्यही केले जाते. भविष्यात येथे महिलांसाठी कौशल्य विकास व फळप्रक्रिया प्रशिक्षण केंद्र उभारले जाईल. संस्कृती संवर्धनाचाही उपक्रम येथे राबविण्यात येईल.

 छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्याचा लढा सुरू केला आणि त्यानंतर जनजाती समाजातील अनेक नायकांनी इंग्रजांविरुद्ध लढा दिला.परंतु त्यांचा इतिहास दुर्लक्षित राहिला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने अशा नायकांची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होत आहे. त्यातून नव्या पिढीला प्रेरणा मिळेल, असे श्री. फडणवीस म्हणाले.

खाज्याजी नाईक यांनी १८५७ च्या समरात भिल्ल जमातीचे ३० हजार लढवय्ये उभे करून महाराष्ट्र व मध्यप्रदेशात मोठा लढा दिला. त्यांच्या लढ्यामुळे इंग्रजांची सत्ता हादरली. इंग्लंडहून त्यांना ठार करण्याचे आदेश आले. त्यांच्यावर त्या काळी दोन हजार रुपयांचे बक्षीस ठेवले होते. त्यांनी इंग्रजांचा खजिना लुटून शस्त्र खरेदी केली. ‘जिथे अन्याय, तिथे खाज्याजी नाईक’ हे समीकरण बनले होते. अंबापाणीच्या लढाईत महिलांनीही शौर्य दाखवले. खाज्याजी नाईक अधिक काळ जगले असते तर कदाचित इंग्रजांना भारत सोडावा लागला असता, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या 'धरती आबा' योजनेंतर्गत राज्यातील आदिवासी गावांमध्ये १७ प्रकारच्या योजनांची अंमलबजावणी होणार आहे. केंद्र शासनाने यासाठी ८० हजार कोटी रुपये मंजूर केले असून, पुढील ५ वर्षांत एकही आदिवासी बांधव बेघर राहणार नाही. त्यांना शिक्षण, आरोग्य, पोषण, रोजगार व रस्त्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल," अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. 

गोर बंजारा समाजाने देशभरात बावड्या, तलाव व पाणवठे उभारून समाजसेवा केली आहे. अशा समाजाच्या प्रेरणास्थळी गोद्री येथे सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल," असे आश्वासनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

    कार्यक्रमात शरदराव ढोले,  अनिल भालेराव, पद्मश्री पवार यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मृतीस्मारक समितीचे सचिव विलास महाजन यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली.

मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस यांना गोद्री येथील प्रसंगांवर आधारित पुस्तक भेट देण्यात आले.

खाज्याजी नाईक स्मृतीस्थळाचे उद्घाटन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाची कोनशिला अनावरण करून उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर सर्व मान्यवरांनी स्मृतीस्थळाची पाहणी केली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी खाज्याजी नाईक यांच्या स्मृती मंदिराला भेट देऊन अभिवादन केले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!