नाशिक दिनकर गायकवाड बोगस दाखले खरे वाटावे म्हणून खोटे शिक्के बनवून बांधकाम कामगार म्हणून नोंद करून शासनाची दिशाभूल करून फसवणूक केल्याप्रकरणी एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,की फिर्यादी सुरेश चिंधू लोहार (रा. वासननगर, पाथर्डी फाटा) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले, की आरोपी जितेंद्र रामदास विधाते (रा. खंडोबा चौक,माळी गल्ली, वडाळा गाय,नाशिक) याने श्री साईसेवा केंद्र येथे स्वतःच्या
आर्थिक फायद्यासाठी बांधकाम ठेकेदार, बिल्डर यांचे तीन खोटे शिक्के अनुक्रमे नहेरी कन्स्ट्रक्शन्स, द्वारकाधीश डेव्हलपर्स व उगले कन्स्ट्रक्शन्स यांच्या नावाने बोगस दाखले बनविले, तसेच मे. व्हीएनएम कन्स्ट्रक्शन्स यांची सहीशिक्का असलेली नियुक्तीची तीन प्रमाणपत्रे बनवून बांधकाम कामगार म्हणून शासन दरबारी नोंदणी केली.
या माध्यमातून आरोपी जितेंद्र विधाते याने बोगस दाखले बनवून शासनाची दिशाभूल करीत फसवणूक केली. हा प्रकार दि. १७ जून रोजी वडाळा गाव येथे उघडकीस आला.या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात विधाते याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चौधरी करीत आहेत.
