उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे केले स्वागत

Cityline Media
0
पुणे सिटीलाईन न्यूज नेटवर्क आपल्या राज्यात उन्हाळी सुट्टीनंतर विदर्भ वगळता १५ जूनपासून शाळा सुरू होत आहे. म्हणजे आज मुलांचा शाळेतील पहिला दिवस आहे. आपण जरी अनोळखी असलो तरी वर्गात बसल्याने ओळखी होत असतात.तेव्हा दुसऱ्या दिवशी आपण एकाच वर्गात असल्याची जाणीव होते. तसेच वर्षभरातील ओळख पहिल्या दिवशी होते. महत्त्वाची बाब म्हणजे, विद्यार्थ्यांना शाळेची ओळख होते.शाळेच्या आसपासचा परिसर समजतो. त्यामुळे शाळेतील पहिला दिवस विद्यार्थ्यांच्या जीवनात अतिशय महत्त्वाचा असतो. तेव्हा मुलांना शाळेची आवड निर्माण करणारा हा पहिला दिवस असतो.पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील आलेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचे पहिल्याच दिवशी राज्याच उपमुख्यमंत्री
 अजित पवार यांनी स्वागत केले.
आजपासून विदर्भ वगळता राज्यातील प्राथमिक शाळांच्या नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी 'शाळा प्रवेशोत्सव २०२५' कार्यक्रम अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अजित पवार यांनी दौंड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा आलेगाव पुनर्वसन या शाळेला सदिच्छा भेट दिली. यावेळी,अजित पवारांनी विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत केले. तसेच,पुस्तकं आणि गणवेशाचे देखील वाटप केले.

"भावी पिढी घडविण्यासाठी विद्यार्थ्यांना आधुनिक, दर्जेदार शिक्षण उपलब्ध करुन देण्यासोबतच सर्व शाळांमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणं ही राज्य शासनाची नैतिक जबाबदारी आहे. त्यादृष्टीने विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकं, गणवेश, बूट उपलब्ध करुन देण्यात येत आहेत, याकरिता राज्य शासन शिक्षणावर मोठ्या प्रमाणात खर्च करीत आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण घेतांना अडीअडचणी येणार नाही, याबाबत दक्षता घेण्यात येत आहे. तसेच, शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना दर्जेदार ज्ञान देण्याच्या दृष्टीनं अध्यापन केले पाहिजे", असे आवाहन यावेळी  उपमुख्यमंत्र्यांनी केले. 

 राज्य शासनाने हाती घेतल्या १० कोटी वृक्षारोपणाचा कार्यक्रमाबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, "प्रत्येक विद्यार्थ्याने किमान एका वृक्षाची लागवड करून त्याचे संगोपन केले पाहिजे. यामुळे लहानपणापासून विद्यार्थ्यांवर पर्यावरण विषयक संस्कार होण्यास मदत होईल. या माध्यमातून पर्यावरणाचा समतोल साधण्याचा आमचा प्रयत्न आहे"

यावेळी, पुणे जिल्ह्यातील गट विकास अधिकारी महेश ढोके, गटशिक्षणाधिकारी संजय महाजन, विस्तार अधिकारी मा. श्रीमती शरीफा तांबोळी, केंद्र प्रमुख मा. सौ. आशा धाडगे, जिल्हा परिषदेचे मा. सदस्य मा.  वीरधवल (बाबा) जगदाळे यांच्यासह आलेगावचे पुनवर्सन, शाळेच्या मुख्याध्यापिका, सरपंच, ग्रामसेवक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदी मान्यवर उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!